सदगुरू पाटील
पणजी, दि. 28 - संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन गेल्या मार्च महिन्यात मनोहर पर्रीकर गोव्याच्या राजकारणात परतले व त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली तरी, त्यांना सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांच्याच कलाने राज्य कारभार चालवावा लागला. विधानसभा पोटनिवडणुकीतील सोमवारच्या घवघवीत यशामुळे आता पर्रीकर यांच्या गोव्यातील नव्या इनिंगला नवे बळ प्राप्त झाले आहे. घटक पक्षांचे ब्लॅकमेलिंगचे राजकारणही यामुळे आता नियंत्रित होऊ शकेल असे मानले जात आहे.जिल्हा पंचायतीच्याही पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारीच लागला. जिल्हा पंचायतींच्या चारपैकी दोन जागा भाजप जिंकला व विधानसभेच्या दोन्ही जागा आम्हीच जिंकलो. आपल्या सरकारच्या कारभारावर गोमंतकीयांनी मोहर उमटवली, असे मुख्यमंत्री निकालानंतर म्हणाले.
पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत आघाडीत गोवा फॉरवर्डचे तीन, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तीन आणि अपक्ष तीन असे एकूण नऊ बिगरभाजप आमदार आहेत. या शिवाय आता भारतीय जनता पक्षाचे स्वत:चे संख्याबळ 14 झाले आहे. यामुळे सरकार पूर्ण स्थिर झाले आहे. गोवा विधानसभा ही एकूण 40 सदस्यांची आहे व अशा विधानसभेत बहुमतासाठी 21 आमदार पुरेसे असतात. पर्रीकर यांच्याकडे एकूण 23 आमदारांचे संख्याबळ आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की 21 ते 23 संख्या ही कोणत्याही सरकारसाठी सुरक्षित असते. त्यामुळे आता आम्हाला काँग्रेसच्या आमदारांची गरज नाही.
पर्रीकर यांनी गेले काही महिने आघाडीच्या घटक पक्षांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. सरकार टीकविण्यासाठी प्रसंगी भाजप कार्यकर्त्यांना दुखवून मुख्यमंत्र्यांनी घटक पक्षाच्या काही मंत्री व आमदारांचे समाधान केले. पर्रीकर स्वत: गोवा विधानसभेचे सदस्य नव्हते. तसेच भाजपचे संख्याबळ फक्त 12 होते. यामुळे घटक पक्षांच्याच कलाने पर्रीकर याना नेहमी पाऊले उचलावी लागली. सोमवारी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला व पर्रीकर विधानसभा सदस्य बनले. सरकारमध्ये व विशेषत: भाजपमध्ये आता नवा उत्साह संचारला आहे.
पर्रीकर यांचा स्वभाव हा मानी आहे. ते सहसा नमते घेत नाहीत पण गेले काही महिने प्राप्त परिस्थितीत त्यांना घटक पक्षांचे ब्लॅकमेलिंगचे राजकारण निमुटपणे सहन करावे लागले, अशी चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. पर्रीकर यांची मुख्यमंत्री म्हणून नवी आणि चौथी इनिंग आता सुरू असून नव्या यशामुळे या इनिंगला आता आत्मविश्वास प्राप्त झाला आहे. याउलट विरोधी काँग्रेस पक्षाचे मनोबल फार कमी झाले आहे.