म्हापसा : आकार, रंग, प्रकार वेगवेगळे मात्र सुंदर आकर्षक सुबक पारंपरिक पद्धतीने बनवलेले पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून दिव्यांचा उत्सव अर्थात दीपावली पर्रा येथे साजरी करण्यात आली. म्हापशापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात बार्देस तालुक्यातील शेकडो लोकांनी यात भाग घेऊन हा उत्सव साजरा केला.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पर्रा गावात पारंपरिक पद्धतीने बनवण्यात येणा-या आकाशदिव्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पर्रा हे मूळ गाव. या उत्सवात माडाच्या झावळीपासून तयार केलेले, गवतापासून, पानांपासून तसेच अगदी साधे कागदी आकाशदिवे तयार करून प्रदर्शनाला मांडले होते. या स्पर्धेत तालुक्यातील सातशेहून जास्त लोक सहभागी झाले असल्याचे माहिती आयोजकांनी दिली. रस्ता दुतर्फा आकाशदिव्यांनी सजवण्यात आलेला. त्यामुळे येथील पूर्ण परिसर आकाशदिव्यांनी उजळून गेला होता. या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी लोकांबरोबर पर्यटकसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वत: अंधारात राहून दुस-याला प्रकाशमय करणे हा दिवाळी सणामागचा मूळ उद्देश असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष प्रदीप मोरजकर यांनी दिली; पण हल्लीच्या काळात दीपावलीचा अर्थ व त्या मागची भावना युवा पिढीत कमी होत चालली आहे. युवा वर्ग वाममार्गाने जाऊ लागला आहे. दीपावली सणाची भावना त्यांच्या मनात रुजावी व हा उत्सव पुन्हा तेजोमय व्हावा यासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मोरजकर यावेळी म्हणाले.
पूर्वीच्या काळात घराघरातून आकाशकंदील पारंपारिक पद्धतीने बनवून लावले जायचे. आजच्या युवा पिढीत मात्र आकाशकंदील बनवण्याची आवड नष्ट होत चालली आहे. याला कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर होत असलेला सोशल मीडियाचा प्रसार. आज दिवाळीला प्रदूषणाला उत्तेजन देणारे प्लास्टीकपासून बनवलेले रेडिमेड आकाशदिवे विकत घेऊन घरात लावले जातात. त्यामुळे पारंपारिकता लोकांजवळ असलेली कला नष्ट होत चालली आहे. या कलेली पुन्हा उभारी मिळावी व पर्यावरणाचा समतोल संतुलीत रहावा हा सुद्धा उद्देश ही स्पर्धा आयोजित करण्यामागे असल्याचे मोरजकर म्हणाले.
आज दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणावर नरकासूराच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धाच्या नावावर काही युवक रात्रभर हिंडून दारूच्या नशेत धिंगाणा घालीत असतात. त्यामुळे युवकांची मानसिकता बिघडत चालली असून गैरप्रकारांना मोठ्या प्रमाणावर उत्तेजन मिळत व त्यात बरीच वाढही झाली आहे. लोकांनी पुन्हा पारंपारिक रुढी व त्या मागचा उद्देश समजून घेऊन समाजाला आपले योगदान दिले पाहिजे, असेही मोरजकर यांनी सांगितले.