पणजी : विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पणजी मतदारसंघात भाजपने उमेदवारी नाकारलेले पर्रीकरपुत्र उत्पल यांनी पक्षाचा निर्णय आपल्याला शिरसावंद्य असल्याचे म्हटले. तसेच, राजकारणात अडथळे पार करुन पुढे जायचे असते, तेच मी करणार आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी मी काम करीन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या या मतदारसंघात त्यांचे पुत्र उत्पल हेही तिकिटासाठी शर्यतीत होते. परंतु, भाजपने त्यांना डावलून माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांना तिकीट दिले. त्या पार्श्वभूमीवर उत्पल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘पक्षाने माझ्या उमेदवारीबाबत ठरविले तर मी आहे, असे मी म्हटले होते. राजकारण स्वच्छ करण्यासाठी येण्याची इच्छा होती. पर्रीकर यांनीही नेहमी हीच इच्छा बाळगली आणि त्यांनाही सुरुवातीला बरेच अडथळे आले. राजकारणात अडथळे पार करुन पुढे जायचे असते, तेच मी करणार आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आणि प्रचारातही सहभागी होणार.’
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘उमेदवारी कोणाला द्यावी याबाबत काही कारणावरुन निर्णय होत नव्हता. अखेर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप केला. उमेदवारी भरण्याची मुदत संपण्याआधी आम्हाला उमेदवार दिला, त्यामुळे मी संघटनमंत्री सतीश धोंड तसेच प्रदेशाध्यक्षांचेही आभार मानतो. उत्पल पुढे म्हणाले की, ‘मी राजकारणात आलेले पर्रीकर यांना नको होते. घराणेशाहीबाबत बोलले जाते. परंतु पर्रीकर हे आता हयात नाहीत. मी स्वतंत्र माणूस आहे. माझे विचार स्वतंत्र आहेत, अनेकजणांनी मला राजकारणात येण्याची विनंती केली, त्यामुळेच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. ‘राजकारणात चांगल्या व्यक्ती याव्यात असे पर्रीकर नेहमीच म्हणत असत. पणजीवासीयांची ताकद मी पाहिलेली आहे. माझ्या वडिलांसारख्या साध्या माणसाला पणजीवासीयांनी मुख्यमंत्री बनविले तसेच केंद्रात संरक्षणमंत्रीपदापर्यंत नेऊन बसविले. पणजीवासीयांनी त्यांच्यासाठी जो घाम गाळला, त्यांच्यासाठी आपल्या चपला झिजविल्या ते मी पाहिले आहे. गेले 15 दिवस मी अनेकांना भेटलो. कार्यकर्त्यांचे श्रम मला जाणवले. हे कार्यकर्ते पर्रीकर यांच्याशी ‘कनेक्टेड’ होते. निवडणुका येतील आणि जातील, परंतु कार्यकर्त्यांकडे ‘कनेक्टेड’ राहणे महत्त्वाचे असल्याचे उत्पल यांनी म्हटले.