पणजी - आपले वडील स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचा सेवेचा व राज्य आणि देशाप्रती असलेल्या बांधिलकीचा वारसा आम्ही पुढे चालवू, असे पर्रीकर यांचे पुत्र उत्पल आणि अभिजात यांनी शनिवारी (30 मार्च) पाठविलेल्या कृतज्ञता संदेशात म्हटले आहे.
पर्रीकर यांचे निधन होऊन बारा दिवस नुकतेच पूर्ण झाले. दु:खाच्या दिवसांत जे नेते, कार्यकर्ते, पर्रीकर यांचे चाहते यांनी प्रत्यक्ष भेटीत किंवा संदेश पाठवून शोक व्यक्त केला, त्या सर्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा संदेश उत्पल यांनी ट्वीटरवर टाकला आहे. आपल्या वडिलांनी प्रत्येक दिवस जिद्द, मजबूत इच्छाशक्ती आणि देश व राज्याच्या सेवेप्रती निष्ठा मनात ठेवून घालविला. पंतप्रधानांनी वडिलांच्या पूर्ण आजारपणाच्या काळात पाठींबा दिला. याविषयीही आभार मानतो असे उत्पल व अभिजात यांनी म्हटले आहे. राज्य व देशाची सेवा करण्याचा वारसा पुढे नेत आम्ही आमचे वडील पर्रीकर यांच्या जीवनाचा सन्मान करू, असे त्यांनी नमूद केले आहे.
जीवनाच्या अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत आपले वडील राज्याला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांशीसंबंधित राहिले. आम्ही आमच्या कुटूंबाचा मध्यवर्ती असा भागच गमावला आहे. तथापि, आम्हाला जी पत्रे व संदेश आले व मोठय़ा संख्येने लोकांनी दु:खाच्या काळात जो सहभाग दाखविला ते पाहून आम्ही एका मोठ्या कुटूंबाचा भाग असल्याची जाणीव झाली. कार्यकर्ता म्हणजेच आपल्या वडिलांचे कुटूंब होते, असेही उत्पल व अभिजात यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उत्पल यांनी पणजीतील विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी, अशा प्रकारची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांमधील एक गट करत आहे. उत्पल यांची अलीकडील एक-दोन विधाने पाहता ते पणजीतून पोटनिवडणूक लढवतील हे स्पष्ट होत असल्याची चर्चा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांत आहे.
पणजीतील उमेदवारीबाबत योग्यवेळी निर्णय घेईन, पर्रीकरांच्या मुलाचे संकेत
भारतीय जनता पक्षातर्फे पणजी विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशा प्रकारची मागणी भाजपाचे काही कार्यकर्ते करू लागले आहेत. सोशल मीडियावरूनही तशाच सूचना येऊ लागल्या आहेत. पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी योग्यवेळी याविषयी काय तो निर्णय घेईन, असे शुक्रवारी (29 मार्च) पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. उत्पल यांनी आतापर्यंत यावर काहीच भाष्य केले नव्हते. गुरुवारी पत्रकारांनी त्यांना विचारल्यानंतर ते प्रथमच बोलले होते. आपण निवडणूकलढवावी अशा प्रकारची चर्चा सोशल मीडियावरून होत आहे हे मला ठाऊक आहे पण मी खरं म्हणजे त्याविषयी अजून विचार देखील केलेला नाही. आम्ही दुखवट्याच्या स्थितीतून आताच बाहेर येऊ पाहत आहोतबारा दिवस पूर्ण झाल्याने धक्क्यातून आम्ही नुकतेच सावरत आहोत. निवडणुकीविषयी योग्यवेळी काय तो निर्णय मी घेईन. लोकांच्या ज्या काही सूचना आहेत, त्यावर निश्चितच विचार केला जाईल पण अजून काही ठरलेले नाही असं उत्पल यांनी म्हटलं होतं.