पणजी : सांत आंद्रेचे भाजप आमदार विष्णू वाघ यांचे कोणतेही काम करायचे नाही, अशी सूचना तीन महिन्यांपूर्वीच पक्षाच्या सर्व मंत्री-आमदारांना करणारे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आता मात्र अचानक वाघ यांच्याशी दाट मैत्री केली आहे. स्वत: वाघांसह भाजपमधील अनेकजण त्यामुळे काहीसे आश्चर्यचकितही झाले आहेत. पर्रीकर यांनी वाघांशी पुन्हा राजकीय सोयरिक कशी काय केली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.थिवीचे आमदार किरण कांदोळकर यांच्या समर्थकांनी रेवोडा येथे वाघांवर केलेल्या हल्ल्यानंतर पर्रीकर व सतीश धोंड हे वाघांच्या कुटुंबीयांकडून टीकेचे लक्ष्य बनले होते. वाघ व पर्रीकर यांचे संबंध त्यानंतरही खूपच ताणले. पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदी असताना वाघ यांच्याकडून गोवा कला अकादमीचे अध्यक्षपदही काढून घेतले होते व गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्षपदही त्यांच्याकडे ठेवले नव्हते. तीन महिन्यांपूर्वी जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी कळंगुट येथे झालेल्या भाजपच्या सर्व मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीवर वाघ यांनी बहिष्कार टाकला होता. त्या वेळी पर्रीकर यांनी वाघ यांचे नाव तुमच्या यादीतून रद्द करा, अशी सूचना सर्व मंत्री-आमदारांना करून एकप्रकारे वाघ यांना एकटे पाडले होते. पर्रीकर यांनी अशा प्रकारची सूचना केल्याची टिप्पणी स्वत: वाघ यांनीही त्या वेळी फेसबुकवर केली होती. मात्र, अलीकडे भाजपच्या काही प्रमुख नेत्यांनी अचानक वाघांविषयी आपली ‘स्ट्रॅटेजी’च बदलली. प्रथम मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्वत: पुढाकार घेऊन व स्वत: प्रयत्न करून वाघांना पुन्हा भाजपमधील मुख्य प्रवाहात आणले. त्या वेळपासून वाघ नियमितपणे भाजप आमदारांच्या बैठकांमध्ये सहभागी होत आहेत. पार्सेकर यांनी वाघांना कला अकादमीही दिली व यापुढे कदाचित मनोरंजन संस्थेची सूत्रेदेखील त्यांच्या हाती येऊ शकतात.पार्सेकर यांच्याप्रमाणेच पर्रीकर व धोंड यांचेही वाघांशी आता अत्यंत चांगले संबंध झाले आहेत. आपल्याला या पक्षाने एक वर्ष वाळीत टाकले होते, असे वाघांनी कुणाला सांगितले, तरी आता खरे वाटणार नाही, एवढे सध्या पर्रीकर व वाघ यांचेसंबंध सुधारले आहेत. (खास प्रतिनिधी)
पर्रीकरांची वाघांशी ‘राजकीय सोयरिक’
By admin | Published: May 19, 2015 1:27 AM