पणजी : गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्रीप्रमोद सावंत मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक बुधवारी सकाळी पार पडली. या बैठकीत माजी मुख्यमंत्रीमनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवावर मिरामार किनाऱ्यावर ज्याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, तेथेच त्यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच, पहिला निर्णय पर्रीकरांच्या स्मारकाचा घेऊन त्यांना एकप्रकारे विनम्र श्रद्धांजलीच वाहिली आहे.
गोवा विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाआधी ही बैठक घेण्यात आली. यासंदर्भात गुरुवारी प्रधानमंत्र्यांना भेटणार असल्याचे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत गुरुवारी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. मुख्यमंत्री बनल्यानंतर सावंत यांची प्रधानमंत्र्यांकडील ही पहिलीच भेट असेल. दरम्यान, विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सावंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतील दोन्ही जागा तसेच मांद्रे, शिरोडा व म्हापसा या विधानसभा पोटनिवडणुकीच्या तिन्ही जागा भाजप जिंकणार असल्याचा दावा केला.
ते म्हणाले की, विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी अपेक्षेप्रमाणे मते मिळाली. विधानसभा पोटनिवडणुकीनंतर आकडा आणखी वाढणार आहे. विजय सरदेसाई आणि मगोपचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर या दोघांचीही उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करणारा आदेश बुधवारी सायंकाळी काढण्यात आला. परंतु मंत्र्यांचे खातेवांटप मात्र लांबणीवर पडले आहे. मुख्यमंत्री दिल्लीहून परतल्यानंतरच खातेवाटप केले जाण्याची शक्यता आहे.