पणजी: राज्यातील प्रशासन कोलमडले आहे. गेल्या सहा महिन्यात मंत्रिमंडळाची एकही बैठक मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या अध्यक्षतेखाली होऊ शकलेली नाही. खाणबंदीसारखा गंभीर विषय सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर मगोप आणि गोवा फॉरवर्ड या घटक पक्षांनी सरकारची साथ सोडावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते यतिश नायक यांनी केली आहे.पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, गेल्या फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री पर्रिकर हे आजारी आहेत. त्यांना अमेरिकेपर्यंत उपचारासाठी नेले. परंतु नेमका कोणता आजार त्यांना जडला आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सरकारने अद्याप जनतेसाठी जाहीर केलेली नाही. त्यांच्या आजाराबद्दल लपवाछपवी चालली आहे. राज्यात सरकारच अस्तित्वात नाही. जनतेचे कोणतेही प्रश्न सुटू शकलेले नाहीत. बंद खाणी पूर्ववत कधी सुरू होणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. बेकारीची समस्या उग्र स्वरूप धारण करून आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घटक पक्षांनी जनतेचे हित पाहून सद्सद्विवेक बुद्धीने सरकारपासून फारकत घेण्याची गरज आहे.नायक पुढे म्हणाले की, काँग्रेस राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी अजूनही सक्षम आहे. आमचे दोन आमदार भाजपने पळवले असले, तरी काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ आहे, असा दावा करीत ते म्हणाले की, 'राज्यपालांना पाच वेळा निवेदने दिली. राष्ट्रपतींनाही निवेदन पाठवले. परंतु अजून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.' भाजपकडे आज नेता नाही, तत्त्वे नाहीत आणि कोणते धोरणही नाही, अशी टीका त्यांनी केली. राज्य सरकारची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे, असा दावा करताना नायक म्हणाले की, सरकार कर्जावर कर्जे काढत आहे. अलीकडेच १०० कोटी रुपयांचे कर्जरोखे बाजारात विक्रीसाठी खुले करण्यात आले आहेत. आणखी किती कर्जे काढणार, असा सवाल त्यांनी सरकारला केला.गेल्या फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री आजारी आहेत. त्यांच्या आजारपणामुळे विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन दिवसात गुंडाळण्यात आले. त्यांच्या आजाराबद्दल भाजपकडूनही लपवाछपवी चालली आहे. सरकार नेतृत्वहीन बनले आहे, असा आरोप नायक यांनी केला. पत्रकार परिषदेस पक्षाचे पदाधिकारी विजय पै उपस्थित होते.
गोव्यात घटक पक्षांनी सरकारची साथ सोडावी; काँग्रेसचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 2:54 PM