पणजी : गोव्यात भाजपाच्या स्थापनादिनी गेल्या ६ रोजी राज्यातील ५० हजारांपेक्षा अधिक घरांवर भाजपाचे झेंडे लागले. १०७० बुथांवर कार्यकर्ते एकत्र येऊन प्रत्येक बूथवर पक्षाचा मोठा ध्वज लागला, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला आहे.
तानावडे म्हणाले की, येत्या १४ तारीखपर्यंत भाजपा सेवा सप्ताह साजरा करणार असून प्रत्येक वॉर्डमध्ये तसेच बूथवर सेवा कार्य केले जाईल. मास्क वाटप, सॅनिटायझर वांटप, स्वच्छता अभियान वॉर्डांमध्ये राबविले जाईल. अधिकाधिक लोकांनी कोविड लसीकरण करून घ्यावे यासाठी पक्ष सरकारला सहकार्य करणार आहे. भाजपचे कार्यकर्ते लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करतील. ४५ वर्षे वयोगटात वरील सर्वांना शंभर टक्के लसीकरण व्हायला हवे, अशी पक्षाची भूमिका आहे. दररोज किमान दहा हजार लोकांचे तरी लसीकरण व्हायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पाचही पालिकांमध्ये भाजपचा झेंडा - प्रदेशाध्यक्षांचा दावा
दरम्यान, म्हापसा, मडगांव, मुरगांव, केपें आणि सांगे या पाचही पालिकांमध्ये भाजपाला बहुमत प्राप्त होऊन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष भाजपचेच होतील, असा दावा तानावडे यांनी केला. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांना आपल्या हातून मडगांव निसटणार याची खात्री झाली त्यामुळेच दोघेही एकत्र आलेले आहेत. परंतु तेथे भाजपाचाच विजय होईल.
'हॉटेल्स, रेस्टॉरंट्समधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हावे'
कोविडच्या प्रश्नावर तानावडे म्हणाले की, हॉटेल्स, रेस्टॉरंट्समधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हायला हवे. सरकारने शिष्टाचार प्रक्रियाही थोडी आणखी कडक करायला हवी. मोठे समारंभ, पार्ट्या नियंत्रणात आणाव्यात. दुकानदारांनी जे ग्राहक विनामास्क येतात त्यांना वस्तू देऊ नयेत. लॉकडाऊन हा पर्याय नव्हे, प्रत्येकाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करायला हवे.