लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : भाजपमध्ये राहणार. मात्र, पद नको, असे म्हणत पणजी भाजप मंडळ अध्यक्षपदावरून आपल्याला मुक्त करावे, अशी विनंती पणजीचे माजी महापौर तसेच पक्षाचे खंदे कार्यकर्ते शुभम चोडणकर यांनी पक्षाकडे केली आहे. वैयक्तिक कारणामुळे आपण ही जबाबदारी घेऊ शकत नाही. त्यामुळे या पदाप्रमाणेच एससी, ओबीसी, आर्थिक विकास महामंडळाच्या संचालकपदाचा ताबाही आपण स्वीकारू शकत नसल्याचेही त्यांनी कळविले आहे.
चोडणकर म्हणाले की, पणजी भाजप मंडल अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा होता. पक्षाने मात्र आता तो वाढवून पाच वर्षांचा केला आहे. मात्र, आपली अध्यक्ष म्हणून तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. पुढील दोन वर्षे अध्यक्षपदी राहण्यास आपल्याला सध्या स्वारस्य नाही. त्यामुळे या पदावरून आपल्याला मुक्त करावे, अशी विनंती आपण त्यांना केली आहे. पक्षात आपल्यापेक्षा जास्त अनुभवी तसेच पात्र नेते आहेत. या पदातून मुक्त करण्याचा निर्णय हा पूर्णपणे वैयक्तिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपण भाजप पक्षात असणार असून नेहमीच पक्षासाठी काम करत राहीन. भाजपात १९९४ मध्ये प्रवेश केला होता. पक्षात २९ वर्षे पूर्ण झालीत. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पणजीचे आमदार तसेच कार्यकर्त्यांनी आपल्याला नेहमीच सहकार्य केले. त्यामुळे भाजप मंडळ अध्यक्षपदावरून मुक्त करण्याच्या केलेल्या विनंतीमागे अन्य कुठलेही कारण नसल्याचेही चोडणकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चोडणकर हे वैयक्तिक कारण देत असले तरी ते निश्चितच तसे नाही. पक्षांतर मतभेदामुळे कदाचित त्यांनी हा निर्णय घेतल्याचीही चर्चा आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"