किशोर कुबल
पणजी : कदंबच्या पणजी-हैदराबाद बसमधून दारुची तस्करी केल्या प्रकरणी दोन बसचालकांना तेलंगणात पकडल्याची माहिती लपविल्याचा ठपका ठेवून पर्वरी डेपोचे साहाय्यक व्यवस्थापक ॲण्ड्र्यु परेरा यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.कदंबचे चेअरमन आमदार उल्हास तुयेंकर यांनी यास दुजोरा दिला. ते म्हणाले कि,‘ परेरा यांचा या प्रकरणात तसा थेट संबंध नसला तरी शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे.
गेल्या आठवड्यात पणजी-हैदराबाद बसमधून दारुची तस्करी केल्या प्रकरणी उल्हास हरमलकर व आबासाहेब राणे या दोन चालकांना तेलंगणात संगारेडी येथे तेथील अबकारी अधिकाय्रांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोघाही चालकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. कदंबची जीए-०३-एक्स-०४७८ क्रमांकाची बस पणजीहून हैदराबादला निघाली होती. ही बस हैदराबादला पोचण्यास अवघे काही अंतर राहिले असता संगारेडी येथे अबकारी अधिकाय्रांनी ती अडवून झडती घेतली असता देशी बनावटीच्या विदेशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. सुमारे १ लाख रुपये किमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या.
कदंब महामंडळ हे राज्य परिवहन महामंडळ असले तरी या बसगाड्यांचीही चेक नाक्यांवर नियमित तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत खुद्द चेअरमननीच व्यक्त केले आहे. यापुढे कदंबचे अधिकारीही बसगाड्यांची आकस्मिक तपासणी करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.