लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : तिळारीच्या कालव्यांच्या दुरुस्ती कामामुळे मध्यंतरी महिनाभर पर्वरी व साळगाववासीयांना पाण्यासाठी प्रचंड वणवण करावी - लागली होती. डिसेंबरच्या अखेरीस - कालव्याची दुरुस्ती करून तिळारीचे पाणी सोडण्यात आले खरे मात्र, अवघ्या चार दिवसांच्या पुरवठ्यानंतर महाराष्ट्राच्या बाजूने कालव्यास भगदाड पडल्याने पाणीपुरवठा पुन्हा बंद करण्यात आला आहे. परिणामी पर्वरी व साळगाववासीयांची जुन्या - वर्षाच्या समारोपाला सुरु झालेली वणवण नवीन वर्षातही कायम राहिली.
महाराष्ट्राच्या हद्दीतील तिळारी धरणाच्या कालव्याला भगदाड पडून गळती सुरु झाल्याने गोव्याच्या बाजूने पाणीपुरवठा सध्या बंद करण्यात आल्याची माहिती साबांखाच्या अभियंत्याने दिली. मात्र, जलस्त्रोतमंत्र्यांनी ही गळती दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याचा दावा केला होता. परंतु, हा दावा फोल ठरल्याचे आढळले. सुरु झालेल्या गळतीमुळे रविवार, ३१ डिसेंबरपासून पुरवठा बंद करणे भाग पडले होते. त्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन रविवारी रात्री पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला.
दुरुस्ती पूर्ण करुन पुरवठा थेट पर्वरीतील जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्यात आला. काल, सोमवारी मध्यरात्रीनंतर तिळारीचे पाणी पर्वरीतील प्रकल्पात पोहचण्याची शक्यता होती. त्यामुळे पाणीपुरवठा पूवर्वत होण्यास व पाणी पर्वरी, साळगावमध्ये पोहचण्यास स्थानिकांना उद्या, बुधवारपर्यंत वाट पहावी लागणार असल्याची माहिती जलस्रोत खात्याकडून देण्यात आली.
तिळारीचे पाणी पुन्हा बंद झाल्याने सोमवारी पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पात पाण्याचा थेंब नव्हता. परिणामी, नवीन वर्षाच्या सुरवातीस पुन्हा पर्वरी व साळगाववासीयांना पाण्याची झळ बसली. पाण्याअभावी लोकांना पुन्हा मानसिक त्रास सहन करावा लागला. मुळात पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्प हा पूर्णतः तिळारीच्याच धरणावर चालत असल्याने हा प्रकल्प बंद करण्यात आला आहे. तर, अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला आमठाणे धरण व साळ नदीतून पाणीपुरवठा केला गेला. पाणीपुरवठा पूवर्वत होण्यास व पाणी पर्वरी, साळगावमध्ये पोहचण्यास स्थानिकांना बुधवारपर्यंत वाट पाहावी लागणार.
महाराष्ट्राच्या हद्दीतील तिळारी धरणाच्या कालव्याला भगदाड पडल्याने पुरवठा बंद करुन दुरुस्ती हाती घ्यावी लागली. रविवारी रात्री दुरुस्ती पूर्ण करुन पर्वरीला पाणी सोडण्यात आले आहे. मंगळवार, २ जानेवारीपर्यंत पर्वरीतील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पुरवठा पूर्ववत सुरु केला जाईल. - मिलिंद गावडे, कार्यकारी अभियंता, जलस्रोत