म्हापसा - एटीएमचे मशीन समजून फोडण्याचा प्रयत्न करणा-या चोरट्यांची फसवणूक होऊन एटीएम मशीन ऐवजी पासबूक प्रिंटीग मशीन चोरल्याने चोरलेले मशीन जागीच टाकून पळून जाण्याची पाळी त्यांच्यावर आली. ही घटना पेडणे तालुक्यातील पार्से गावात घडली.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना काल रात्री घडली. नंतर गुरुवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. पार्से येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएममधील पासबूक प्रिंटीग मशीन चोरट्यांनी पळवून पार्से डोंगर माळरानावर फेकून दिले. एटीएममध्ये चोरी झाल्याची तक्रार शाखा प्रबंधक प्रिया गावस यांनी पेडणे पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून तपास केला असता पासबूक मशीन चोरट्यांनी गायब केल्याचे लक्षात आले. बँकेपासून ५०० मीटर अंतरावर झाडांत हे मशीन टाकून चोरटे पळून गेले. रोख रक्कम चोरीला गेली नाही. या शाखेत सीसीटीव्ही बसवले असल्याने दोघे चोरटे कॅमे-यात बंदिस्त झाले आहेत. दोन बुरखाधारी चोरटे एटीएम फोडताना हाताला मोजे व काळे बुरखा व लाल टीशर्ट घालून चोरटे एटीएम मशीनवर हातोडे मारताना दिसत होते. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाल्यानंतर पुढील तपास गतीने लावला जाईल असे पोलीस उपनिरीक्षक केरकर यांनी सांगितले.
पार्से येथील एटीएममध्येही रात्रीच्यावेळी सुरक्षारक्षक तैनात केला नव्हता. रात्रीच्यावेळी रक्षक नसल्याने एटीएम फोडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. सुमारे दोन महिन्यापूर्वी आगरवाडा-पेडणे येथील स्टेट बँक आॅफ इंडियायाचे एटीएम मशीन चोरट्यांनी रिक्षात घालून पळवून नेले होते व बोडकेधेनू आगरवाडा डोंगर माळरानावर नेवून फोडले व त्यातील १८ लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम पळवली होती. त्याचा तपास पोलिसांनी नंतर लावून चोरट्यांना दिल्लीत अटक केली होती. त्यानंतर धारगळ येथे दोन एटीएम एकाच रात्रीत फोडली. त्याचा तपास मात्र आजपर्यंत पोलिसांना लावता आला नाही. मागच्या आठ दहा दिवसांपूर्वी धारगळ अर्बन सोसायटीत चोरी होवून एक लाखांपेक्षा जास्त रक्कम चोरट्यांनी पळवली होती त्याचाही आजपर्यंत पेडणे पोलिसांना तपास लावता आला नाही. पेडणे तालुक्यात मागील दोन महिन्या पासून एटीएम फोडण्याचे किंवा मशीन चोरुन नेण्याचे प्रकार वाढले आहेत. वाढलेल्या या प्रकारामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले असून पेडणे पोलीस त्यांच्या मागावर सध्या लागले आहेत.