- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: झपाट्याने जगभर पसरणार्या कोरोना विषाणूमुळे सर्व क्रूझ जहाजांनी आपली ऑपरेशन्स बंद केल्याने गोव्यातील असंख्य कुटुंबावर अनिश्चितेची पाळी जहाजावर काम करणार्या हजारो युवकांचे होणार काय? हा प्रश्न ठाण मांडून उभा राहिला आहे. सध्या या जहाजावर काम करणारे किमान तीस ते चाळीस हजार गोमंतकीय अडकून पडले आहेत. त्यांचे काय होणार या चिंतेने त्यांच्या कुटुंबियांनाही घोर लागून राहिला आहे.
बोटीवर काम करणे हा गोवेकरसाठी पूर्वीपासूनचा रोजगाराचा पर्याय असून कित्येक गोमंतकिय पीएनओ,वायकिंग, एमएससी, आरसीसीएल, कोस्टा, आयदा अशा नामांकीत क्रूझ कंपन्यात काम करतात, त्यांची संख्या किमान चाळीस हजारांच्या आसपास असावी. मात्र या सगळ्या कंपन्यांनी आपली ऑपरेशन्स दोन महिन्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती सुधारली तरच त्या सुरू होणार आहेत. जर हा कालावधी वाढला तर असंख्य गोवेकरावर बेरोजगारीची पाळी येणार आहे.
गोवन सी फेयरर्स असोसिएशनचे अध्यक्ष डिक्सन वाझ यांच्या मताप्रमाणे या विषाणूमुळे असंख्य गोवेकर अनिश्छ्तेच्या गर्तेत सापडले आहेत, भविष्यात त्याचे दूरगामी वाईट परिणाम होऊ शकतील. सध्या कित्येक गोमंतकीय अमेरिका आणि युरोपमध्ये अडकून पडले असून ते घरी तरी परतू शकतील का याचाही घोर त्यांच्या घरच्यांना लागून राहिला आहे. दक्षिण अमेरिकेतच दोन हजाराच्या आसपास गोवेकर खलाशी अडकले आहेत. कामच नसल्याने शेकडोंच्या संखेने गोवेकर गोव्यातही येऊ लागले आहेत.
वाझ म्हणाले, जर परिस्थिती सुधारली नाही तर कित्येक क्रूझ कंपन्या दिवाळखोरीत जाऊ शकतात. तसे झाल्यास हजारो गोवेकरांच्या नोकर्या जाण्याची शक्यता आहे. सध्या जरी सगळे आलबेल दिसले तरी येणारा काळ धोक्याचा असू शकतो. कित्येकांनी कर्ज काढून या नोकर्या धरल्या होत्या असे युवक अडचणीत येण्याची शक्यता आहे. गोव्यातील ख्रिस्ती समाजातील बर्याच मोठ्या प्रमाणावर युवक बोटीवर नोकरी करतात.
लग्नेही पडली अडून
लग्न ठरलेले काही गोवेकर सध्या विदेशात अडकून पडल्याने त्यांची लग्नेही अडकली आहेत सांगे केपे परिसरात अशी तीन प्रकरणे पुढे आली आहेत. इतर ठिकाणीही अशी प्रकरणे असू शकतात. कुडचडे येथील च्यारी नावाच्या युवकाचे लग्न एप्रिल महिन्यात होणार असून सध्या तो कुवेत मध्ये अडकून पडल्याने विवाहाचा मुहूर्त तो गाठू शकेल का या चिंतेने त्याच्या कुटुंबीयांना ग्रासले आहे. केपेतील देसाई कुटुंबावरही विवाह पुढे ढकलण्याची पाळी आली आहे कारण जहाजावर काम करणारा नवरदेव मस्कत विमानतळावर अडकून पडला आहे. सावर्डेतील एका कुटुंबावरही अशीच पाळी आली आहे.