पणजी: दाबोळी विमानतळावरून पुणे येथे जाणारे दुपारी १.३० वाजताचे स्पाइस जेटचे विमान सुटू न शकल्याने काल गुरुवारी प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. सुमारे शंभरहून अधिक प्रवासी अडकून पडले.
बुधवारी दुपारच्या स्पाइस जेटच्या विमानाबाबतही असाच प्रकार घडला. प्रवासी सुमारे २४ तास अडकून पडले. तांत्रिकी दोषाचे कारण देऊन विमान सोडण्याची वेळ वारंवार पुढे ढकलण्यात येत होती. गुरुवारी दुपारी दीड वाजता सुटणारे विमान विलंबाने म्हणजे ३.४५ वाजता सुटेल असे सुरुवातीला सांगण्यात आले. परंतु ते या वेळेत काही सुटले नाही. त्यानंतर ५.५५ ची वेळ दिली गेली. नंतर रात्री ८ ची व त्यानंतर मध्यरात्री १ ची वेळ दिली गेली. बुधवारीही अशीच वेळ वाढवत मध्यरात्री १ वाजताचे विमानही रद्द करण्यात आले. त्या विमानाचे प्रवासीही गुरुवारी विमानतळावर होते. २४ तास विमानतळावर रखडल्याने प्रवाशांनी यामुळे संतप्त रूप धारण करीत स्पाइस जेटच्या काउंटरवर गोंधळ घातला.
दाबोळी विमानतळ संचालक धनंजय राव यांच्याशी या प्रतिनिधींने संपर्क साधला असता त्यांनी गोवा- पुणे स्पाइस जेटचे विमान वेळेवर सुटू शकलेले नाही या वृत्ताला दुजोरा दिला. तांत्रिकी दोषामुळे विमान रखडल्याचे ते म्हणाले. हे प्रकार आणि नित्याचेच असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. स्पाइस जेटच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.