पणजी : आगामी वर्षात म्हणजेच 2019 मध्ये पतंजलीचे कपडे बाजारात येणार आहेत. पतंजलीचे लहानांपासून ते मोठ्यापर्यंतचे पारंपारिक आणि वेस्टन कपडे बाजारात आणणार असल्याची माहिती योगगुरु बाबा रामदेव यांनी दिली. गोव्यातील पणजी येथे अॅडव्हर्टायजिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'गोवा फेस्ट-2018' या कार्यक्रमात त्यांनी सांगितले.लोक मला विचारतात आहेत की, पतंजलीची जीन्स बाजारात कधी येणार आहे? त्यामुळे याबाबत निर्णय घेतला असून लवकरच बाजारात पतंजलीचे कपडे आणणार आहोत. यामध्ये पारंपारिक कपड्यांसोबतच लहान मुले, महिला आणि पुरुषांसाठीचे कपडे 2019 पर्यंत बाजारात येतील. यासोबतच, आगामी काळात पतंजली स्पोर्ट्स आणि योगा साठीचे विशेष कपडेही तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पतंजली आयुर्वेद वर्षानुवर्षे आर्थिकदृष्ट्या चांगली कामगिरी करीत असल्याचा दावा करत येत्या काळात पतंजली देशातील सर्वात मोठी कंपनी असेल, असे रामदेव बाबा यांनी सांगितले. रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीचे सध्या सौंदर्यप्रसाधने आणि खाद्यपदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी रामदेव बाबा यांनी स्वदेशी कपड्यांची ओळख म्हणून गारमेंट निर्मिती करण्याचा प्लॅन असल्याचे सांगितले होते. दरम्यान, महाराष्ट्रातील सोलापुरातून पतंजलीच्या माध्यमातून टेक्सटाईल उद्योग सुरू करण्याचे संकेत गेल्या काही दिवसांपूर्वी रामदेव बाबा यांनी दिले आहेत. पतंजली टेक्सटाईल ब्रँडचे टॉवेल आणि बेडशीट येथून तयार करण्याचे सूचक वक्तव्य केले होते. सोलापूरातील पतंजली योग समिती आणि भारत स्वाभिमान ट्रस्टच्या वतीने येथे तीन दिवसीय योग चिकित्सा ध्यान साधना शिबिर झाले, त्यावेळी ते बोलत होते.
2019 मध्ये पतंजलीच्या जीन्स येणार बाजारात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 4:23 PM