पणजी : मगोपमधून भारतीय जनता पक्षात दाखल होत मंत्रीपद मिळविलेले दीपक पावसकर यांना सार्वजनिक बांधकाम खाते प्रदान करणारी अधिसूचना सरकारने गुरुवारी जारी केली. सुदिन ढवळीकर यांच्याकडे वाहतूक व नदी परिवाहन ही खातीही होती. पण पावसकर यांना ही खाती न देता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ती स्वत:कडेच ठेवली आहेत.
सावर्डे मतदारसंघाचे आमदार असलेले पावसकर यांना मगोमधून भाजपमध्ये प्रवेश देताना झालेल्या वाटाघाटींवेळीच भाजपच्या नेत्यांनी बांधकाम खाते देण्याची ग्वाही दिली होती. वाहतूक खाते बाबू आजगावकर यांना द्यावे, असे त्यावेळी ठरले होते. पावसकर यांना बांधकाम खात्याबरोबरच वस्तूसंग्रहालय (म्युझियम) हे खातेही देण्यात आले आहे. सध्या वाहतूक व नदी परिवहन ही खाती जरी मुख्यमंत्र्यांकडे ठेवली गेली तरी, यापुढे जेव्हा सर्व मंत्र्यांना अतिरिक्त खाती देण्याची वेळ येईल, त्यावेळी आजगावकर यांना वाहतूक खाते दिले जाईल, असे सुत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच कदाचित सर्व मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांचे वाटप केले जाईल. आजगावकर हे मगोमधून भाजपात आले तरी, त्यांना अतिरिक्त खाते देण्यात आले नाही. पावसकर हे त्यांच्या बांधकाम खात्यावर समाधानी आहेत. पावसकर वगळता अन्य सर्व मंत्र्यांकडे पूर्वीचीच खाती ठेवण्यात आली आहेत.
दोन उपमुख्यमंत्री, आदेश जारी ढवळीकर मंत्रिमंडळात असताना दोघांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. ढवळीकर यांना डच्चू दिल्यानंतर मंत्रिमंडळात फक्त विजय सरदेसाई हेच एकमेव उपमुख्यमंत्री राहिले होते. आजगावकर यांना उपमुख्यमंत्रीपद देणारा लेखी आदेश सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने गुरुवारी दुपारी जारी केला. आजगावकर हे उपमुख्यमंत्रीपदावर खूष आहेत. पण आपल्याला वाहतूक खाते तत्काळ मिळेल, असे त्यांनी आपल्या कार्यकत्र्याना सांगितले होते. त्याबाबत त्यांचा तूर्त अपेक्षाभंग झाला. ढवळीकर सचिवालयातील जे केबिन वापरत होते, ते केबिन गुरुवारी उपमुख्यमंत्री सरदेसाई यांना देण्यात आले आहे.