पणजी : राजधानी पणजी शहरातील पाच प्रमुख मार्गावर फक्त कारगाड्यांसाठी पे पार्किंग लागू होत आहे. उत्तर गोवा जिल्हाधिका-यांनी याविषयीची अधिसूचना जारी केली आहे.
दि. 16 सप्टेंबरपर्यंत पे पार्किंगविषयीची सगळी तयारी संबंधित यंत्रणेने करणे गरजेचे बनले आहे. तयारी केल्यानंतर जिल्हाधिका-यांना अहवाल देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर आहे, असे जिल्हाधिका-यांनी अधिसूचनेत म्हटले आहे. पणजीत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. बहुतांश सरकारी खात्यांची मुख्यालये पणजीत आहेत. अनेक उपकार्यालयेही आहेत. गोव्याच्या खेड्यापाड्यातील लोक कामांसाठी पणजीत येतात. शिवाय पर्यटकांची हजारो वाहने पणजीत फिरत असतात.
नोव्हेंबरपासून गोव्यात पर्यटकांची गर्दी वाढण्यास आरंभ होतो. त्यावेळी वाहतुकीची कोंडी जास्त होते आणि वाहने पार्क करायलाच जागा मिळत नाही. फक्त रविवारी जागा मोकळी असते. पणजीत प्रमुख मार्गावर पे पार्किंग केले तरी, सरकारी वाहनांना हे पे पार्किंग लागू नसेल. 18 जून मार्ग हा जास्त गजबजलेला मार्ग आहे. सनराईज हॉटेल ते पणजी चर्च चौकाकडील बीएसएनएलच्या कार्यालयापर्यंत पे पार्किंग लागू होईल. चार तासांसाठी वीस रुपये दर आकारला जाईल.
त्यानंतरच्या प्रत्येक अतिरिक्त तासासाठी 1क् रुपये आकारले जातील. रुआ कुन्हा रिवेरा रोडवर ए. बी. नाईक चौकापासून हॉटेल विनंतीर्पयत व गार्सिया दे ऑर्तापर्यंतच्या मार्गावर पे पार्किंग असेल. डॉ. आत्माराम बोरकर रस्त्यावर चर्च चौकाकडील कॉर्पोरेशन बँक ते रायू चेंबरच्या विरुद्ध दिशेपर्यंत पे पार्किंग असेल. ज्यो कॅस्ट्रो रस्त्याच्या बाजूला डाऊन द रोड नावाच्या पबपासून जुन्या सचिवालयापर्यंत (मागिल बाजूला) पे पार्किंग लागू होणार आहे. ज्ॉक सिक्वेरा रस्त्याच्या बाजूला मिरामार सर्कल ते शारदा मंदिर स्कुलच्या पहिल्या गेटर्पयत दोन्ही बाजूने पे पार्किग असेल.
पे पार्किंगचा निर्णय पणजी महापालिकेने घेतला व त्यास वाहतूक पोलिस विभागाने मान्यता दिली. पे पार्किंग शूल्क घेणा-या व्यक्तीकडे ओळखपत्र असावे. त्याने गणवेश घातलेला असावा. तसेच जिथे पे पार्किंग आहे, तिथे पे पार्किग असे लिहिलेले फलक लावलेले असावेत. त्यावर शुल्काचे प्रमाणही लिहिलेले असावे. दुसरी वाहने अडकतील अशा पद्धतीने टोकावर कुणी वाहन लावलेले नसावे. पार्किंग लॉट्सना रंग असावा. डबल पार्किंग किंवा फुटपाथवर पार्किंग असू नये, असे जिल्हाधिका-यांनी म्हटले आहे.