पणजी: पणजीत शनिवार १ जून पासून पे पार्किंगला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात कामे सुरु असल्याने पे पार्किंग ३१ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पणजी मनपा ने घेतला होता.
मात्र आता स्मार्ट सिटीची ९० टक्के कामे पूर्ण झाली असून बहुतेक रस्ते वाहतूकीसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे वाहने पार्क करण्यास रस्त्यावर पुरेशी जागा उपलब्ध असल्याने आता मनपा ने शहरात पुन्हा एकदा अडीच महिन्यांनी पे पार्किंगला सुरुवात केली आहे. मनपाने पणजीतील पे पार्किंग बंद ठेवण्याचा निर्णय २३ मार्च रोजी घेतला होता.
महापौर रोहित मोन्सेरात म्हणाले, की स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पणजीतील काही रस्ते वाहतूकीसाठी बंद होते. तर अन्य काही रस्त्यांची कामे सुरु होती. यामुळे लाकांना आपली वाहने पार्क करण्यास बराच अडथळा येत होता. यामुळे मनपा ने ३१ मे पर्यंत पे पार्किंग शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता कामे पूर्णत्वाकडे येत असल्याने पे पार्किंग पुन्हा एकदा सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.