पणजी : सत्तेवर आल्यानंतर राज्यातील नियोजन व विकास प्राधिकरण (पीडीए) रद्द करू. तसेच कॅसिनोंचे परवानेही रद्द केले जातील, अशी ग्वाही कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो दिली. हे धाडस केवळ कॉँग्रेस सरकारच असे करू शकेल, असा दावा त्यांनी केला. दैनिक लोकमतच्या ‘लोकमंच’ उपक्रमात बोलताना फालेरो यांनी, २५ पेक्षा अधिक जागा मिळवून काँग्रेस सरकार स्थापन करणार, असे सांगितले. ओडीपीद्वारे भ्रष्टाचाराचे आगर बनलेल्या पीडीएची राज्याला गरज नाही, असेही ते या वेळी म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारविरोधात आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. जाहीरनामा बनविण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. कॅसिनोवाले गोमंतकीयांना बरबाद करण्यासाठी टपले आहेत. त्यामुळे राज्यात कॉँग्रेसचे सरकार आल्यानंतर कॅसिनोंचे परवाने रद्द केले जातील. लोकांना नादाला लावून कर्जबाजारी करण्याचे काम या कॅसिनोंनी केले आहे. कॉँग्रेसच्या जाहीरनाम्यातही या निर्णयाचा उल्लेख असेल, असे ते म्हणाले. खनिज खाणींना आमचा विरोध नाही; परंतु पर्यावरणाचा समतोल राखून केलेला खनिज उद्योग हवा आहे, असे स्पष्ट मत फालेरोंनी व्यक्त केले.
सत्तेवर आल्यास पीडीए, कॅसिनो हद्दपार : फालेरो
By admin | Published: December 28, 2016 1:15 AM