हणखणे, पेडणे : तोरसे, मोपा, इब्रामपूर या भागात आतापर्यंत सात माकडे मेल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, तोरसे भागात दोन दिवसांत पाच मृत माकडे आढळून आली. ही माकडे केएफडी (कॅस्नूर फॉरेस्ट डिसिज)बाधित असण्याची शक्यता आहे. याबाबत सरपंच विलास शेट्ये यांनी वन विभाग, पशुसंवर्धन व आरोग्य विभागाला कल्पना दिली आहे. वन विभागाने याबाबत तातडीची पावले उचलली आहेत; परंतु आरोग्य विभागाला अजून जाग आलेली नाही. या विषयी शेट्ये यांनी सांगितले की, तोरसे गावात बुधवारी तीन मृत माकडे आढळून आली होती तर गुरुवारी दोन मृत माकडे आढळून आली आहेत. दरम्यान, तोरसे गावात दोन दिवसांत पाच माकडे मृतावस्थेत आढळून आल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. ही माकडे केएफडी बाधित असण्याची शक्यता असल्याने व त्यावरून माणसांनाही हा आजार जडण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे. सध्या काजूचा हंगाम सुरू असल्याने येथील लोकांना काजू बागायतीत जाण्यावाचून पर्याय नाही; परंतु माकडतापाच्या भीतीने बागायतीत जाण्यास लोक घाबरू लागले आहेत.सरपंच विलास शेट्ये यांनी याबाबत वन खात्याला कळवल्यानंतर वनअधिकारी विलास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षकांनी तोरसे येथे जाऊन मृत माकडांची विल्हेवाट लावली. पशुसंवर्धन खात्याचे डॉ. नाईक यांनी पंचनामा केल्यानंतर या माकडांना अग्नी देण्यात आला. माकडताप तोरसे भागात पसरू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सरपंच विलास शेट्ये यांनी केली. (प्रतिनिधी)
पेडणेही माकडतापाच्या छायेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2017 1:46 AM