सत्ताधाऱ्यांवर लोक नाराज; अपेक्षापूर्तीसाठी विरोधकही कमी पडतात: एल्वीस गोम्स
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 11:31 AM2023-12-30T11:31:56+5:302023-12-30T11:32:25+5:30
'लोकमत'च्या व्यासपीठावर मांडल्या भावना
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सत्ताधा-यांविरोधात गोमंतकीयांमध्ये खदखद आहे परंतु, सक्षम विरोधक म्हणून काँग्रेस पक्ष कमी पडत असल्याचे लोकांना वाटत आहेत. मात्र काँग्रेस त्यावर नक्कीच मात करेल. पक्षाची निर्माण झालेली छबी बदलण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून एक कणखर विरोधक म्हणून काँग्रेस सत्ताधाऱ्यांना नक्कीच टक्कर देईल, असा विश्वास काँग्रेसचे नेते एल्वीस गोम्स यांनी व्यक्त केला.
पणजी येथील 'लोकमत' कार्यालयास काल, शुक्रवारी दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडे आपण दक्षिण गोव्याच्या उमेदवारीसाठी दावा केला आहे. तिकीट कुणाला द्यावी यासाठी लोकांचे म्हणणे लक्षात घेणे गरजेचे आहे. मग ती तिकीट मला मिळावी किंवा अन्य कोणालाही, कारण शेवटी उमेदवार म्हणून कोणाला स्वीकारावे है लोक ठरवतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोम्स म्हणाले, सरकारी सेवेत एका उच्च पदावर असताना आपण नोकरीचा राजीनामा दिला. त्यावेळी राजकारणात येण्याचा कुठलाही हेतु नव्हता. परंतु तेव्हाच आम आदमी पक्ष गोव्यात दाखल झाला व मी त्यात प्रवेश केला. राजकीय क्षेत्रात आपने मला व्यासपीठ दिले. दरम्यान, कुठल्याही राजकीय पक्षाचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर असले तरी प्रादेशिक पातळीवरील मुद्दे वेगळे असतात, याकडे पक्षाने लक्ष देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
मंत्रीच झाले अधिकारी
सध्या मंत्रीच अधिकारी झाले आहेत. प्रत्येक निर्णय तेच घेत आहेत, कुणाला कुठल्या योजनेचा फायदा मिळावा इथपासून ती कशी राबवावी हेसुद्धा तेच ठरवत आहेत. आपण सरकारी सेवेत असताना मात्र चित्र बरेच वेगळे होते. त्यामुळे आताच्या सिस्टिमशी आपल्याला कितपत जुळवता आले असते हा मोठा प्रश्नच आहे.
आरजीने आमची मते नेली, ती मते परत मिळवू
दक्षिण गोव्यात काँग्रेसच्या प्रभावावर आपण आताच बोलू शकत नाही, आरजीकडे गेलेली बहुतांश मते ही काँग्रेसची होती, तर भाजपच्या अवघ्याच मतांचा यात समावेश आहे. त्यामुळे काँग्रेसची जी मते दुसरीकडे गेली आहेत, ती परत आणायला हवीत, यासाठी पक्षाने सर्वांना एकत्र घेऊन काम करावे, असेही गोम्स म्हणाले.
राहुल गांधींशी चर्चा अन् मी काँग्रेसमध्ये
कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या सागण्यावरून आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गांधी यांच्याशी आपण दिल्लीत १२ ते १३ मिनिटं याविषयी चर्चा केली. गोव्यातील त्यावेळेच्या काँग्रेस नेतृत्वाकडून मात्र आपल्याला फारसा प्रतिसाद नव्हता. गांधी यांनी सांगितल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी फोन करून
आपल्याला पक्षात प्रवेश करण्यासाठी आमंत्रित केले.