लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : गेल्या दीड महिन्यापासून एका महिलेचा पाठलाग करणाऱ्या संशयित रॉकी डिसिल्वा (वय ४२, रा. सासमोळे - बायणा) याची शनिवारी लोकांनी यथेच्छ धुलाई केली. त्याला मुरगाव पोलिसांनी अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
मुरगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक राघोबा कामत यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास ही घटना घडली. जानेवारी महिन्यापासून वास्कोतील एका महिलेचा अज्ञात व्यक्ती पाठलाग करीत होता. ती महिला बायणा वास्को येथून उपासनगर येथे जाताना ती व्यक्ती तिचा पाठलाग करायची. पाठलागाचा प्रकार लक्षात येताच या महिलेने नातेवाईकांना माहिती दिली होती. शनिवारी सकाळी त्या अज्ञात व्यक्तीने पाठलाग सुरू करताच महिलेच्या नातेवाईकांनी त्या व्यक्तीला बायणा वास्को येथे अडवून त्याबाबत जाब विचारला.
स्थानिकांना याची माहिती मिळताच त्याची तेथे जबर धुलाई करण्यात आली. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला. मुरगाव पोलिसांनी चौकशी केली असता त्याचे नाव रॉकी डिसिल्वा (रा. सासमोळे - बायणा) असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला अटक केली. नंतर हमी घेऊन त्याची जामिनावर सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"