पणजी : मी काय आहे ते पणजीवासीय आणि गोमंतकीय माझ्या कामावरून ठरवतील. माझ्या कामावरूनच माझी राजकीय पात्रता ठरेल. भाजपची वाढ ही स्वत: माझ्या घरापासून पाहिलेली आहे. भाजपने काहीही सांगितल्यास मी ते करेन, कोणतीही जबाबदारी पार पाडेन, असे दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले.गोवा सुरक्षा मंचचे प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी उत्पल हे निवडणुकीच्या राजकारणात येणार नाहीत, कारण ते पॉलिटीकल मटेरियल नव्हे पण ते सद्गृहस्थ आहेत अशा अर्थाचे भाष्य केले होते. त्यावर पत्रकारांनी विचारताच उत्पल म्हणाले की खरे म्हणजे मला अशा विषयांवर भाष्य करायचेच नाही. तथापि, मी काय मटेरियल आहे हे लोकच निश्चित करतील. मी सदगृहस्थ आहे असेही सुरक्षा मंचाच्या नेत्याने म्हटलेय हेही माङयासाठी स्वागतार्ह आहे. मी काय आहे हे पणजीवासिय ठरवतील.उत्पल म्हणाले की भाजप हा माझ्यासाठी नवा नव्हे. भाजपाची सुरुवात आमच्या घरातूनच झाली. मी लहानातून जसा मोठा झालो, त्याच पद्धतीने समांतरपणे भाजपची वाढ झाली. प्रथम भाजपाकडे कार्यालय नव्हते. त्यामुळे आमच्या घरीच भाजपच्या बैठका व्हायच्या. मी तेव्हा लहान होतो. पण मी पाहिले आहे. सतीश धोंड वगैरे त्या बैठकांसाठी येत असे. मी त्यांना सतीश काका म्हणायचो. धोंड किंवा संजीव देसाई हे सगळे भाजपचे काम करत राहिले व त्यांचे काळे केस पांढरे झाले. काहीजणांचे काळे केस मात्र अलीकडेच पांढरे झाले आहेत.उत्पल म्हणाले, की एवढा काळ आपण सक्रिय राजकारणापासून दूर राहिलो होतो, कारण एक पर्रीकर ते काम करत असताना दुसऱ्याने दूर रहायला हवे. आपण राखलेले ते अंतर म्हणजे स्ट्रॅटेर्जिकल कृती होती. मला आता भाजपने श्रीपाद नाईक यांच्यासाठी काम करायला सांगितल्याने मी काम सुरू केले आहे. पणजीच्या तिकिटाविषयी वगैरे मी बोलत नाही, कारण त्याविषयी काय ठरवायचे ते पक्ष ठरवील. पक्ष जे सांगेल, त्यानुसार मी काम करेन. पणजीत आणखी कुणाला तिकीट दिले तरी मी काम करेन.वेलिंगकर यांचे नाव न घेता उत्पल म्हणाले, की अलिकडे पर्रीकर यांना कुणीही शिव्या घालण्याची फॅशन आलेली आहे. पर्रीकर हे राष्ट्रीय नेते होते व त्यामुळे त्यांना दोष दिला की, आपली राष्ट्रीय बातमी होईल असे काहीजणांना वाटते. काहीजण हवेतच तत्त्वांच्या गोष्टी बोलतात. केवळ टीव्हीवर किंवा यू-ट्युबवर बातमी दिसावी म्हणूनच काहीजण बोलतात. ठोस असे काही न करता तत्त्वांविषयीच हवेतील बोल ते ऐकवतात. मला काँक्रीट असे म्हणजेच ठोस असे काही तरी करायचे आहे. मला भाजपचा अनुभव आहे, शिवाय मी अमेरिकेत शिकून आल्यानंतर एक उद्योग उभा करून अनेकांना रोजगार संधी दिली, तोही अनुभव माझ्या गाठीशी आहे. उत्पल म्हणाले की, पर्रीकर यांनी राजकारण शुद्ध असावे म्हणून प्रयत्न केला. ते स्वत: संरक्षण मंत्री असताना लाखो-कोटींचे बजेट ते हाताळत असे. तरीही आम्ही स्वच्छ राहिलो. मला अशा प्रकारच्याच शुद्धतेची जोड गोव्यातील राजकारणाला देण्यात यश आले तर ते मला समाधानाचे वाटेल. पर्रीकर आजारी असतानाही अखेरच्या काळातही ते गोव्यातील काही प्रकल्प पूर्ण करायचे आहेत याविषयी बोलायचे, चिंतन करायचे. तिसऱ्या मांडवी नदीवर पुलाचे बांधकाम होऊन त्याचे उद्घाटन झाल्यानंतर मग आपले काम संपले असे कदाचित पर्रीकर यांना वाटले असावे. कारण त्यानंतरच त्यांचे आरोग्य ढासळण्यास आरंभ झाला. पर्रीकर केवळ एकदाच पुलावर गेले. पण पुढील अनेक पिढ्यांसाठी तो पूल कायम राहिला आहे. मलाही असे कायमस्वरुपी काही करता आले तर ते योग्य ठरेल.
मी काय आहे ते गोमंतकीय ठरवतील- उत्पल पर्रीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 8:32 PM