पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृत्रिम फुग्यातील हवा लोकांनी काढून घेतली, अशी शब्दात तीन राज्यांमध्ये भाजपच्या झालेल्या पानीपतावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रतिक्रिया दिली.
चोडणकर म्हणतात की, ‘भाजप आणि त्यांच्या नेत्यांच्या खोटाडरडेपणाला जनतेने चोख उत्तर दिले. हे मतदान स्वातंत्र्य, लोकशाही आणि निधर्मी तत्त्वांसाठी आणि बहुसांस्कृतिक भारतासाठी झालेले आहे. समावेशक भारताची ओळख जनतेला कायम ठेवायची असून आगामी लोकसभा निवडणुकीकरिता भारतीय राजकीय व्यवस्थेसाठी नवी दिशा लोकांनी घालून दिली आहे.’
मोदी यांच्या लोकशाही संस्था नष्ट करण्याच्या तसेच फुटीच्या राजकारणाच्या नीतीला कंटाळून लोकांनी हा कौल दिला आहे. काँग्रेसच्या या विजयाचे श्रेय पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी आखलेले धोरण तसेच भ्रष्टाचाराविरुध्द उघडलेल्या आघाडीलाही जाते.
‘गोव्याच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम’ या निकालांचा गोव्याच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम होणार असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे. राज्यात भाजपसोबत सत्तेत सामील असलेल्या गोवा फॉरवर्ड तसेच अन्य घटक पक्षाला हा धडा आहे. या पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर विधानसभेत तसेच सभागृहाबाहेरही टीका केली होती, असे चोडणकर म्हणतात. मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघातील आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला किंमत मोजावी लागेल कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी काँग्रेसला दिलेला कौल भाजने हिरावून घेतला. गेले नऊ महिने राज्यात प्रशासन नाही. सत्तेचा गैरवापर करु नये तसेच लोकांनाही गृहित धरु नये हा धडा या निकालांमधून भाजपने घ्यावा, असा सल्लाही चोडणकर यानी दिला आहे.
पणजीत काँग्रेसचा विजयोत्सवराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशानिमित्त प्रदेश काँग्रेसने फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. सायंकाळी ५ च्या सुमारास येथील काँग्रेस भवनासमोर प्रदेश समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले व त्यांनी ‘काँग्रेस झिंदाबाद’, राहुल गांधी यांचा विजय असो’ अशा जोरदार घोषणा दिल्या. प्रदेश प्रवक्ते ऊर्फान मुल्ला, संकल्प आमोणकर तसेच जनार्दन भांडारी व अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत ऊर्फान मुल्ला प्रदेश काँग्रेसतर्फे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे अभिनंदन करताना म्हणाले की, ‘ परिवर्तनाच्या लाटेत भाजप वाहून गेला आहे. भाजप सत्तेसाठी हपापलेला होता व काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पहात होता परंतु लोकांनीच त्यांना त्यांची जागा दाखवली.