पणजी : महापालिकेतील सत्ताधारी गटाला सरकारचे सहकार्य मिळत नसल्याने राजधानीतील समस्या सोडविण्यास महापौर असमर्थ ठरत आहेत. पणजीत पहिल्याच पावसात रस्त्यांवर पाणी साचून राहत आहे. रस्त्यांच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग, गटारांच्या लाद्या फुटलेल्या स्थितीत तसेच हल्लीच सुरु झालेला पे-पार्किंग प्रकल्प मंदावला असल्याचे दिसून येते. शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या उद्भवली असून रस्त्याच्या दुतर्फा साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांतून पादचाऱ्यांना वाट काढावी लागत आहे. महापौर सुरेंद्र फुर्तादो त्यांनी एप्रिल महिन्यापासूनच पावसाळापूर्व कामास सुरुवात केली होती. मात्र, कामगारांच्या कमतरतेमुळे पाऊस सुरु झाला तरी बऱ्याच प्रभागांतील कामे अर्धवट स्थितीत राहिली आहेत. ठिकठिकाणी फुटलेल्या गटारांच्या लाद्यांमुळे पावसाचे पाणी भरुन वाहते. वाहनचालकांना याचा अंदाज येत नाही आणि पार्किंग करताना बऱ्याच दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे टायर फुटलेल्या लाद्यांमध्ये अडकतात. पणजीतील १८ जून रस्ता, हॉटेल नवतारा, गोवा मनोरंजन संस्था, गोवा फार्मसी कॉलेज इत्यादी जागांवर रस्त्यांवर पाणी भरुन राहते. सतत दोन ते तीन तास पाऊस पडल्यास अनेक ठिकाणी रस्ते पाण्याने भरुन जातात. रस्त्याच्या दुतर्फा असलेली गटारे साफ करण्यात आली नसल्याने पाण्याला वाट मिळत नाही. तसेच गटरातील कचऱ्याचे ढिगारे पुन्हा पाण्याच्या प्रवाहाने वाहत जाऊन गटारात अडकत असल्याने पाणी तुंबून राहते. सोमवारी सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे महापालिकेच्या कामगारांना कचरापेट्या साफ करणे शक्य झाले नाही. दुपारी पावसाचा वेग कमी झाल्यानंतर शहरातील विविध भागात असलेल्या कचरापेट्या साफ करत असताना महापालिकेचे कामगार दिसत होते. रस्त्यानजीक असलेली कचरा मिश्रीत माती फेकून देण्यासाठी जागा नसल्याने ती अजूनही पडून आहे. (प्रतिनिधी)
राजकीय संघर्षात लोक वेठीस
By admin | Published: June 14, 2016 2:55 AM