समीर नाईक, पणजी: ताळगावमध्ये सुरुवातीला जास्त मतदान झाले नाही, पण सकाळी ११ नंतर लोकांनी गर्दी केली होती. संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी गर्दी दिसून आली. त्यामुळे यंदा गेल्यावर्षाच्या जास्त प्रमाणात मतदान होऊ शकते, दुपारपर्यंत खूप उष्णता होती, तरी लोकांनी घराबाहेर पडत मतदान केले, त्यामुळे त्यांचे जास्त कौतुक, असे मत ताळगाव आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी व्यक्त केले.
लोकांनी आमच्या सरकारवर विश्वास ठेवत प्रचंड गर्मी असताना देखील मोठ्या प्रमाणात मतदान केले. यावरून स्पष्ट होते की लोकांना मोदी हेच पंतप्रधान हवे आहे. भविष्यात भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वगुरू म्हणून प्रस्थापित व्हायचे असेल तर मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, हे लोकांना माहीत झाले आहे. विकसित भारत हीच दूरदृष्टी ठेवत लोकांनी मतदान केले आहे, असे मोन्सेरात यांनी यावेळी सांगितले.
ताळगाव मधील प्रत्येक मतदार केंद्रात लोकांनी गर्दी केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे चांगले काम झालेले आहे. सर्वांना गर्मीत आवश्यक सर्व साधन सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. सर्व केंद्रे स्वच्छ व नितळ आहे. पोलिसांचे देखील खूप कौतुक. ते दिवसरात्र केंद्रावर तैनात होते. ज्या लोकांना व्हीलचेअरची आवश्यकता आहे, त्यांनाही व्हीलचेअर केंद्रात उपलब्ध करून देण्यात आले, असेही मोन्सेरात यांनी अधिक माहिती देताना सांगितले.