शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

गुण खोऱ्यांनी; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 11:57 AM

विद्यार्थ्यांना परीक्षेत खोऱ्यांनी गुण मिळत आहेत, मात्र हे त्यांच्या गुणवत्तेचे प्रमाण खरेच आहे का?

डॉ. रेवा दुभाषी, स्त्री रोगतज्ज्ञ, फोंडा

मी सातवी पास होऊन आठवीत जाणार होते. त्यावेळी दहावीत मेरिट लिस्ट यायची. पूर्ण गोव्यात पहिल्या पन्नास मुलांत आपले नाव असणे ही अभिमानाची गोष्ट असे. आमच्या स्कूलमध्ये तोपर्यंत तिसरी भाषा फक्त मराठी आणि कोकणी होती आणि त्याच वर्षापासून संस्कृत भाषा सुरू करणार होते. मी आठवीत मराठी विषय सोडून संस्कृत घ्यावा, असे मला काही शिक्षकांनी आणि हितचिंतकांनी सुचविले. संस्कृत स्कोअरिंग सब्जेक्ट आहे. मराठीत एवढे मार्क मिळणार नाहीत. मग दहावीत मेरिट लिस्टमध्ये येणे कठीण होईल म्हणून मी संस्कृत विषय घ्यावा, असे त्यांचे म्हणणे होते. 'स्कोअरिंग सब्जेक्ट' हे शब्द मी संस्कृतच्या बाबतीत पहिल्यांदा ऐकले. मी गोंधळून गेले. माझे बाबा पक्के मराठीप्रेमी. ते मला म्हणाले, "तुला खरेच संस्कृत घ्यायचा आहे का? मराठी विषय सोडायचा आहे का? नाही ना? ही काय स्कोअरिंगची भानगड आहे? तुला मराठी विषय आवडतो तर त्याच भाषेत चांगले मार्क मिळवून तू बोर्डात येऊन दाखवा".

मराठी विषय खरेच माझा अतिशय आवडीचा होता. मी तो सोडला नाही आणि मराठीत ८६ मार्क घेऊन मी बोर्डात अठ्ठाविसावी आले. मिरजेत राहाणाऱ्या माझ्या मामेभावंडांना आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले, “एवढे मार्क पडतात भाषा विषयात गोव्यात? एवढी चांगली मराठी येते तुला? आमच्याकडे मराठीत पंचाहत्तर पडतात पहिले येणाऱ्याला!"

हा काळ कधीतरी मागे पडला. संस्कृत भाषेला प्रोत्साहन मिळावे म्हणून त्या भाषेत जास्त मार्क देण्याची टूम निघाली. त्याअनुषंगाने पेपर पॅटर्न ठरविला गेला. परीक्षण ठरविले गेले. मग बाकीच्या भाषा का मागे राहतील? फ्रेंच भाषेत जास्त मार्क दिले जाऊ लागले. हळूहळू इंग्लिश, हिंदीतसुद्धा भरभरून मार्क मिळू लागले.. कोकणी मराठी सोडून मुले दुसऱ्या भाषा घेत आहेत म्हटल्यावर तसे होऊ नये म्हणून या भाषांचे पेपर पॅटर्न आणि परीक्षण बदलले. हळूहळू हिंदी-इंग्लिश आणि सगळेच भाषा विषय भरभरून मार्क वाटू लागले. पूर्वी फक्त गणितात पैकीच्या पैकी गुण पडायची शक्यता असे. आता सगळ्याच विषयांत पैकीच्या पैकी गुण पडू शकतात. त्यामुळे मुलांचे मार्कस् वाढू लागले. त्यातही मजेशीर गोष्ट म्हणजे ज्या विषयात पैकीच्या पैकी गुण पडू शकतात त्या गणित विषयात मात्र कमी मार्क येऊ लागले. पहिल्या, दुसऱ्या येणाऱ्या मुलाला अवघे एक-दोन गुणच कमी पडून त्याची टक्केवारी ९९च्या वर गेली.

शाळांचे रिझल्ट १०० टक्के लागू लागले. नव्वद टक्क्यांवर मार्क मिळविणाऱ्या मुलांची, डिस्टिंक्शनमध्ये येणाऱ्या मुलांची संख्या वाढली. शिक्षक खूश! मुले खूश! पालक खूश! सर्वांची चार दिवसांच्या स्टेट्स आणि डीपीची सोय झाली.

गुण मिळाले; पण गुणवत्तेचे काय? इंग्लिशमध्ये २५ टक्के मार्क मिळविणाऱ्या मुलाला एक साधे पत्र लिहिता येत नाही. आपले पाठ्यपुस्तक सोडून बाकी कसलेही अवांतर वाचन नसलेल्या मुलाला मराठीत ९७/९८ गुण पडतात; पण पेपरमधली एक बातमीसुद्धा धड वाचता येत नाही की, सलग चार वाक्ये मराठीत बोलता येत नाहीत. अलीकडे निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा फारशा आयोजित होत नाहीत आणि झाल्या तरी त्यात भाग घेण्यात कुणाला काही स्वारस्य असत नाही.

अलीकडे कुठेही प्रवेश मिळविण्यासाठी प्रवेश परीक्षा असतात. ज्यात मल्टिपल चॉइस प्रश्न असतात. त्यामुळे मोठी उत्तरे लिहायचा आणि ती लिहून घ्यायचा सरावही कोणी करीत नाही. पालकांचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे ध्येय हे फक्त प्रवेश परीक्षा पास करून हव्या त्या शाखेत प्रवेश घेणे हेच असते. आठवीपासून मुलांचा सगळा वेळ त्या परीक्षांची तयारी करणे, वेगवेगळ्या क्लासेसना जाणे यातच जातो. त्यामुळे अवांतर वाचन, छंद हे सगळेच थंडावले आहे. आपल्याला भाषा चांगली बोलता यावी, चांगली लिहिता यावी, अशी कोणाचीही इच्छा-अपेक्षा नाही. त्यामुळे हे मार्क म्हणजे बेडूक फुगवून हत्ती करायचे आणि स्वतःला फसवायचे प्रकार आहेत. यामुळे येणारा फाजील आत्मविश्वास पुढे अधोगतीला कारणीभूत ठरतो.

तो अनेकदा वृत्तपत्रांतील बातम्यांच्या व्याकरणात, टीव्हीवरच्या बातम्यांत, नव्या भाषा शिक्षकांत वगैरे दिसतो. आता वाढते तंत्रज्ञान, समाजमाध्यमांवरील वावर आणि तिथे वापरली जाणारी भाषा यांचाही परिणाम भाषिक गुणवत्तेवर होत आहे. परप्रांतीय लोकांच्या वावरामुळे परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषा बदल आहेत. अनेक भाषा चिंध्यांसारख्या वापरून धेडगुजरी भाषेत व्यवहार करणे हेच आज प्रचलित झाले आहे. इंग्रजीतसुद्धा आता कितीतरी शॉर्ट फॉर्म स्टाइल म्हणून वापरले जातात. ईमोजीची नवी भाषा थोड्याफार प्रमाणात सगळेच वापरतात. नवीन पिढीचा फंडा हाच की भावनाओं को समझो!' भाषा महत्त्वाची नाही आणि याचे सोयरसुतक कुणालाच नाही! भाषेला उत्तेजन देण्यासाठी सुरू झालेली ही सढळ हस्ते मार्क द्यायची पद्धत नव्या पिढीचे नुकसान करते हे सर्वजण मान्य करतात. भाषेच्या मुळावर आलेली आणखी एक गोष्ट म्हणजे पुस्तक प्रकाशनासाठी मिळणारे सरकारी अनुदान! एकेकाळी हा अभिमानाचा विषय आणि गुणवत्तेचे द्योतक असायचा. लोकांना लिहायला, वाचायला उत्तेजन मिळावे, म्हणून सुरू झालेली ही एक चांगली सरकारी योजना होती.

आर्ट अँड कल्चरने छापलेली पुस्तके विकत घेऊन लायब्ररींना वाटायचा चांगला उपक्रम सुरू केला; पण अर्ज केलेल्या प्रत्येक पुस्तकाला गुणवत्ता न बघता कधीतरी भविष्यात हा लेखक उत्तेजन मिळून चांगले लिहील, या आशेने अनुदान दिले जाते. काही प्रकाशकांनी यातून आपला धंदा तेजीत आणला आहे. कसली पुस्तके छापली जात आहेत, कोण वाचत आहेत की नुसते वाचनालय भरून जाते आहे, याचा कोणीही विचार करीत नाही. कसलीच गुणवत्ता नसलेली, व्याकरणाच्या अक्षम्य चुका असलेली पुस्तके प्रकाशित करायला उत्तेजन देऊन भाषेचे नुकसान होतेय आणि कोणीतरी भलताच आपली पोळी भाजून घेतो, हे उघड सत्य नजरेस येत असणारच. अशा पुस्तकांना गल्लीबोळातले कुसुमाग्रज, गदिमा पुरस्कार मिळतात आणि ते मिरवले जातात. विकत घेतल्या जाणाऱ्या पुरस्कारांचा नवीन धंदा अनुदानामुळे जन्माला आला आहे.त्याऐवजी गुणवत्तेनुसार काही पुस्तकांनाच अनुदान देऊन जास्त भर व्याकरण लेखन कार्यशाळांवर, शिक्षकांच्या कार्यशाळांवर दिला तर भाषेचे काहीतरी भले होईल.

चांगल्या हेतूने सुरू झालेली एखादी कार्यपद्धती किंवा योजनांचा अनेकदा गैरफायदा घेतला जातो आणि अपेक्षित फळ मिळत नाही; पण निदान ते लक्षात आल्यावर तरी त्यावर पुनर्विचार व्हायला हवा. मूळ प्रयोजन काय त्याचा विसर पडता कामा नये.

इथे मूळ हेतू भाषेला उत्तेजन देणे हा होता; पण नेमके उलट होऊन ते भाषेला मारक ठरत आहे. याला वेळीच आवर घालणे महत्त्वाचे आहे.

 

टॅग्स :goaगोवाEducationशिक्षण