ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 12- मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचा कांदोळी येथील 90 कोटींचा ‘किंगफिशर व्हिला’ ताब्यात घेण्यास उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना गुरुवारी परवानगी दिली. मल्ल्या गोव्यात आल्यानंतर याच व्हिलामध्ये राहात होते. तसेच येथे पार्ट्याही होत असत. युनायटेड स्पिरिटच्या वतीने अॅड. पराग राव यांनी असे स्पष्ट केले की, कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांसमोर दावा मागे घेतला आहे.
हजारो कोटी रुपये कर्जाची थकबाकी असलेल्या मल्ल्या यांना एसबीआय कॅप्सने या मालमत्ता जप्तीची मागणी केली होती. मल्ल्या यांच्या तीन कंपन्या युनायटेड स्पिरिट लि., किंगफिशर एअरलाइन्स व युनायटेड ब्रीवरिजने यास आक्षेप घेतला होता. बँकांना जप्ती शक्य होऊ नये यासाठी मल्ल्या यांनी केअरटेकर म्हणून व्यवस्थापक नेमला होता. सध्या बुडीत गेलेल्या किंगफिशर एअरलाइन्ससाठी मल्ल्या यांनी हाच व्हिला गहाण ठेवून कर्ज घेतले होते. केअरटेकरने कूळ कायद्याच्या आधारे बँकांना मालमत्ता जप्तीत अडथळा आणला.
बँकांनी जप्तीसाठी हालचाली केल्या असता युनायटेड स्पिरिटने त्यास हरकत घेऊन हा व्हिला खरेदी करण्याचा आपल्याला पहिला हक्क पोचतो, असा दावा केला होता. पोर्तुगीज सिव्हिल कोडमधील तरतुदींचा आधार घेऊन कोर्टात जाऊन लिलाव रोखण्याचाही प्रयत्न केला. बँकांना ही मालमत्ता जप्त करण्यास परवानगी देण्याच्या बाबतीत विलंब केला त्यामुळे एसबीआय कॅप्सने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली. या याचिकेवर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना सुनावणी पूर्ण करून निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती.