लोकमत न्यूज नेटवर्क काणकोण : पूर्वी दुखावलेल्या तसेच पक्षापासून दूर गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांशी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी तसेच मुख्यमंत्र्यांनीही भेटून अशा कार्यकर्त्यांचे तसेच काही माजी आमदारांचे मन वळवण्याची मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये तीन गट पडले होते. एक गट भाजपाचे माजी आमदार तथा अपक्ष उमेदवार विजय पै सोबत तर, दुसरा गट माजी मंत्री व अपक्ष उमेदवार इजिदोर फ़र्नाडिसकड़े वळला होता. तर तिसरा गट भाजपाचे अधिकृत उमेदवार रमेश तवडकरासोबत राहिला होता. अपक्ष म्हणून या विधानसभा निवडणुकीत इजिदोरने ६०१२ मते तर विजय पै खोत यांनी ४७९१ मते घेतली होती. म्हणजे यातील सुमारे १०८०३ भाजपाची मते फोडली होती.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार नरेंद्र सावईकर हे काहीशा हजार मतांनीच हरले होते. त्यामुळे यंदा भाजपाने कोणत्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे ध्यानात धरुन व स्थानिक पातळीवरील नेत्याशी ज्यांचे वैर आहे व ते भाजपाच्या मताधिक्यात बाधा येऊ शकतात. त्यांच्याशी स्वतःहून संपर्क साधून त्यांची मनधरणी करण्यात भाजपा पक्षश्रेष्ठी सध्या सफल झाली आहे.
भाजपाच्या स्थानिक नेत्यापासून दुखावलेल्या २० एक जणांनी नुकतीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावड़े यांची भेट घेऊन त्यांच्याशी लोकसभा निवडणुकीसंबधात चर्चा केली. व आपण सुद्धा भाजपाच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेपे यांसाठी काम करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्याना दिली. एरवी कोंकणीत म्हण आहे. 'फेस्त करता गांव आनी प्रेजिन्तीचे नांव' भाजपाला मिळालेल्या मतांची आघाडी मिळेल, त्याचे श्रेय हे नेमके कुणाला मिळेल हा जो प्रश्न होता त्याचेही उत्तर गुरुवारी धुल्लगाळ येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी दिले आहे.
दुसऱ्या बाजने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही कॉग्रेस पक्षापासून काही अंतर दूर राहिलेल्या जनार्दन भंडारी यांच्याशी संपर्क साधून पक्ष कार्यात वाहून घेण्याची विनंती केल्याने जनार्दन भंडारी व त्याची टीम कामाला लागल्याने उत्साह निर्माण झाला आहे. महादेव देसाई यांनी सुद्धा काँग्रेस पक्षात घरवापसी करून काँग्रेसचे पारडे जड केले आहे.
अलिप्त राहिलेल्या इजिदोर फर्नांडिस यांनी गुरुवारी २४ तासांच्या आत शेकडो समर्थकाना एकत्र करून आपले शक्तीप्रदर्शन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापुढे मांडले. म्हणजेच इजिदोरसुद्धा गर्दी खेचून आणू शकतात व 'हम भी कुछ कम नहीं' हे त्यांनी दाखवले. लोकसभा निवडणुकीवेळी फएकत्र झालेले हे नेते व कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीवेळी भाजपासोबत एकसंघ राहू शकतील काय? हा प्रश्न आहे.
काणकोणचा गड
'श्रेय, कुणा एका नेत्याला मिळणार नसून संपूर्ण काणकोणवासियाना ते मिळणार आहे. मुळ भाजपाच्या मुशीतील या कार्यकर्त्यांनी सद्या 'हूंदराच्या जाळानी घराक उजो लावचो न्हयं' हा पवित्रा घेतला असून त्याचा फायदा नक्कीच भाजपाला मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यात मुख्यमंत्र्यानी इजिदोर फर्नाडिसच्या समर्थकासमवेत बैठक घेतली तसेच विजय पै खोत व त्याच्या समर्थकासोबतही बैठक घेणार असल्याने विजयचीही साथ भाजपाला मिळणार असल्याने काणकोणचा गड जिखणे भाजपाला कठिन जाणार नाही.
आघाडी मिळण्यास वाव
इजिंदोर ने बोलावलेल्या बैठकीत गांवडोंगरी सरपंच धिल्लन देसाई, खोतीगावचे माजी सरपंच दया गावकर, मीना गावकर, श्रीस्थळचे माजी सरपंच देवेंद्र नाईक, माजी मंडळ अध्यक्ष नंदिप भगत, व त्याचे साथीदार उपस्थित होते. त्यामुळे भाजपाला काणकोणात आघाडी मिळण्यास वाव आहे. तसेच काणकोण नगरपालिकेकड़े जे ४ नगरसेवक सत्ताधारी गटापासून दूर होते त्यानाही पाठिंबा दर्शवितानाच प्रचार कार्यात व्हावुन घेतल्याने भाजपला त्याचा फायदा मिळणार आहे.