पणजी : राज्यात पेट्रोलवरील व डिझेलवरील मूल्यवर्धीत करात सरकारने वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल लिटर मागे दीड रुपयांनी तर डिझेल लिटरमागे ६० पैशांनी महागले आहे. अर्थ खात्याचे अव्वल सचिव प्रणब भट यांच्या सहीने याबाबतची अधिसूचना जारी झाली आहे. पेट्रोलवरील मूल्यवर्धीत कर आता २७ टक्के केला गेला आहे. डिझेलवरील मूल्यवर्धीत कर २३ टक्के करण्यात आला आहे.
देशभर व राज्यातही अगोदरच पेट्रोल व डिझेलचे दर वाढलेले आहेत. त्यात पुन्हा आता दीड रुपये पेट्रोलवर व ६० पैसे डिझेलवर वाढल्याने एकूणच वाहतूक महागणार आहे. गोव्यात पेट्रोलचा दर अगोदरच ८० रुपयांच्या पुढे गेलेला आहे. एकदा वाहतूक महागली कीत्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर होतो. नव्या वाढीमुळे सरकारच्या तिजोरीत काही कोटींचा अतिरिक्त महसुल येईल.
दरम्यान, सरकारची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे दर महिन्याला तीनशे कोटींचे कर्ज घेत आहे. शिवाय गेल्या चार वर्षांत चारवेळा तरी पेट्रोल व डिझेलचे दर वाढविण्यात आले आहेत. गेल्यावर्षीही अर्थसंकल्प सादर करण्याच्या कालावधीत सरकारने पेट्रोल व डिझेलवरील वेट वाढवला होता.