पणजी : राज्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर १ रुपयाने तर डिझेल ३६ पैशांनी वाढले आहेत. नवीन दर उद्या शनिवार २२ पासून लागू होणार आहेत. दरवाढीचे वृत्त पसरताच पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या.
वित्त खात्याने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलसाठी आता व्हॅट वाढवून २१.५ टक्के तर डिझेलवरील व्हॅट वाढवून १७.५ टक्के करण्यात आला आहे. या दरवाढीसाठी २००५ च्या गोवा मूल्यवर्धित कर (व्हॅट) कायद्याच्या परिशिष्टात दुरुस्ती करण्यात आली आहे.
राजधानी शहरातील पेट्रोल पंपचे मालक अनुप कंटक यांच्याशी संपर्क साधला असता शहरात पेट्रोलचा दर सध्या प्रति लिटर ९५.२३ रुपये तर डिझेलचा दर ८७.७९ रुपये एवढा असल्याचे सांगितले.
नवीन दराबाबत विस्तृत माहिती आम्हाला अजून मिळायची आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, उद्यापासून पेट्रोल व डिझेल महागणार असल्याचे वृत्त पसरताच पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या.