पणजी : गोव्यात पेट्रोल व डिझेलवर असलेल्या मूल्यवर्धीत करात (व्हॅट) सरकारने शुक्रवारी प्रत्येकी पाच टक्क्यांची वाढ केली. यामुळे पेट्रोलची किंमत 2 रुपये 77 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 1 रुपये 65 पैसे प्रति लिटरने वाढली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होत आहे.
सरकारला नव्या वाढीमुळे दरमहा साडेबारा कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. म्हणजेच वाणिज्य कर खात्याच्या तिजोरीत वार्षिक दीडशे कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे जमा होणार आहे. पेट्रोलचा नवा दर आता 66 रुपये 53 पैसे असा आहे, तर डिझेलचा नवा दर 64 रुपये 98 पैसे असा आहे. सरकार सध्या विविध पद्धतीने महसूल वाढ करू पाहत आहे. खनिज खाणी बंद असल्यानेही सरकारवर ताण आलेला आहे. सरकारच्या तिजोरीतील गंगाजळी विविध कारणास्तव आटल्याने सरकारने कल्याणकारी योजनांवरीलही खर्च कमी केला आहे, असे सुत्रांनी सांगितले.
पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट पूर्वी 15 टक्के होता. तो आता 20 टक्के झाला आहे. वाणिज्य कर खात्याचे आयुक्त दिपक बांदेकर यांनी लोकमतला सांगितले की, ही दरवाढ झाली तरी देखील अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात पेट्रोल- डिझेलचे दर कमीच आहेत. महाराष्ट्र व कर्नाटकच्या तुलनेत गोव्यातील इंधनाचे दर जास्त नाहीत. ज्यावेळी देशभर इंधनाचे दर खूप वाढले होते तेव्हा गोव्याने व्हॅटचे प्रमाण खूप कमी केले होते. पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्यानंतर व्हॅट वाढविण्यात आला.
दरम्यान, 2012 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट शून्य करून इंधनाचे दर सोळा रुपयांनी कमी केले होते.