पणजी: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा दर प्रत्येकी अडीच रुपयांनी वाढला आहे. पेट्रोल व डिझेल जवळजवळ 70 रुपये प्रति लिटर झाले आहे. पेट्रोल पंप व्यावसायिकांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच वाढीव दर आकारणी सुरू केली. डिझेल दर वाढल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे.गेल्या महिन्यातच गोवा सरकारने पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धीत कर (व्हॅट) वाढवला होता. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर वाढले होते. यावेळी पुन्हा केंद्र सरकारने अर्थ संकल्पातून इंधनावरील अबकारी कर व अधिभाराचे प्रमाण वाढवले. यामुळे राज्यात पेट्रोलचा दर शनिवारी प्रति लिटर 69 रुपये 3 पैसे असा झाला आणि डिझेलचा दर 69 रुपये 46 पैसे झाला. पेट्रोल व डिझेलचे दर अलीकडे वाढत गेल्याने गोवा सरकारच्या तिजोरीत महसुलाची भर पडली आहे. डिझेलचे दर वाढल्यानंतर बस वाहतूक महाग होते. तसेच सगळीच वाहतूक महागल्याने भाजीपाल्याचेही दर वाढत असतात. केंद्रीय अर्थसंकल्प हा त्यादृष्टीने महागाई वाढवणाराच ठरेल, अशी प्रतिक्रिया गोमंतकीयांमध्ये व्यक्त होत आहे. पूर्वी गोव्यात पेट्रोलचा दर हा अन्य राज्यांपेक्षा खूप कमी होता. आता मात्र हा दर वाढत चालला आहे. गोवा सरकार सध्या दरमहा 100 कोटी रुपयांचे कर्ज घेऊ लागले आहे. रोखे विक्रीस काढून गेल्या दोन महिन्यांत तीनवेळा कर्ज घेतले गेले. शनिवारीही रोखे विक्रीस काढल्याची अधिसूचना जारी झाली आहे. सातत्याने रोखे विक्रीस काढून हा निधी विकास कामांसाठी वापरला जात असल्याचा सरकारचा दावा आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातच तशी तरतूद केलेली आहे असेही सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
गोव्यात पेट्रोल- डिझेल 70 रुपये प्रति लिटर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 10:26 PM