पणजी : कर्नाटक आणि महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात पेट्रोलचा दर कमी आहे. यामुळे पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याची शक्यता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फेटाळून लावली आहे. केंद्र सरकारने अबकारी कर कमी केल्यानंतर सर्व राज्यांना पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांना विचारले असता त्यांनी गोव्यात अगोदरच पेट्रोल व डिझेल स्वस्त आहे असे सांगितले.
देशातील कुठल्याही राज्याचे पेट्रोल व डिझेलचे दर पाहिल्यास गोवा हे कमी दरात पेट्रोल व डिझेल विक्री करत असल्याचे आढळून येते असे मुख्यमंत्री म्हणाले. अन्य राज्यांमध्ये व्हॅटचे प्रमाण जास्त आहे. गोव्यात आम्ही यापूर्वीच व्हॅट कमी करून ग्राहकांना दिलासा दिला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.]गोव्यात पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर सध्या 15 टक्के आणि डिझेलवरील कर 19 टक्के आहे. गोव्यात पेट्रोल प्रती लिटर 63.84 रूपये आणि डिझेल 57.83 रूपये दराने विकले जात आहे.
2012 ते 2016 सालापर्यंत गोव्यात पेट्रोल लिटरला 60 रूपयांहून कमी दराने विकले जात होते. यापूर्वी व्हॅट कमी केल्याने गोवा सरकार दरमहा काही कोटी रुपयांच्या महसूलाला मुकत आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.