पणजी : पंचावन्न वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रीय काम केलेले प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी बंड करत गोव्यात नवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला. त्याबाबतची चर्चा केवळ गोव्यातच नव्हे तर देशभर सुरू असून वेलिंगकर यांना देशाच्या विविध भागांतून फोन येत आहेत. तुम्ही दाखविलेल्या धाडसाची पुनरावृत्ती देशात अन्य ठिकाणीही होऊ शकते, असे फोन करणारी मंडळी वेलिंगकर यांना सांगत आहे. वेलिंगकर यांच्या निकवर्तीय स्वयंसेवकांनी ही माहिती दिली. वेलिंगकर म्हणजेच संघ, असे समीकरण गोव्यात गेली चार दशके कायम राहिले. गोवा मुक्तीनंतर १९६१ सालीच गोव्यात नागपूरच्या संघाची पहिली शाखा सुरू झाली होती. वेलिंगकर तेराव्या वर्षापासून संघाच्या संपर्कात आले. त्यांनी संघचालक म्हणून समर्थपणे काम केले. शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी आंदोलनाची गरज म्हणून भाजपाला शह देण्याच्या हेतूने वेलिंगकर यांनी नवा राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली व संघाच्या कोकण प्रांताने वेलिंगकर यांना संघचालक पदावरून मुक्त केले. (खास प्रतिनिधी)
वेलिंगकरांना देशभरातून फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2016 1:16 AM