पणजी: ऑनलाईन वर्गाचा दुरूपयोग करून विद्यार्थ्यांनी शिक्षकांची छायाचित्रे मोबाईलवर टिपून ती आक्षेपार्ह पद्धतीने अपमानजनकरित्या सोशल मिडियावर अपलोड करण्याचा प्रकार मिरामार - पणजी येथील प्रसिद्ध शारदामंदिर विद्यालयाच्या काही विद्यार्थ्याकडून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामुळे विद्यालयाला ऑनलाईन वर्ग बंद करावे लागले असून या प्रकरणी पोलिसात तक्रारही देण्यात आली आहे.
ज्या काही वाईट, अनैतिक आणि गलिच्छ गोष्टी निदान शैक्षणिक क्षेत्रात तरी घडू नयेत, अशी अपेक्षा असते. परंतु नेमक्या त्याच क्षेत्रात असे प्रकार घडत असल्याचे धक्कादायक प्रकार उघड होत आहेत. कोविड १९ च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे ऑनलाईन वर्ग घेण्याचे काम बहुतेक सर्व शैक्षणिक संस्थांकडून सुरू आहे. या संस्थेनेही ते सुरू केले होते. त्यानुसार संस्थेचे शिक्षक व शिक्षिका वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांचे वर्ग घेत होते.
झूम या मोबाईल अॅपच्या आधारावर हे वर्ग सुरू होते. परंतु सर्वच विद्यार्थी या प्रक्रियेचा शिकण्यासाठी वापर करीत नव्हते तर त्यांचा हेतू वेगळा असल्याचेही आढळून आले आहे. कारण काही विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिगदरम्यान शिक्षकांचे फोटो मोबाईलवर स्क्रीन शॉट व इतर पद्धतीने क्लीक करून ते फोटोशॉप केले. विकृत पद्धतीने ते इन्स्टाग्राम या सोशल मिडिया अॅपवर अपलोड केले आहेत.
ही माहिती कळताच शिक्षकांनी संस्थेच्या प्राचार्यांना माहिती दिली. प्राचार्य शर्मिला उमेश आणि प्रशासक ऑस्कर गोन्साल्वीस यांनी २४ जूनला पालकांना व विद्यार्थ्यांना उद्देशून पत्र लिहिले असून त्यात विद्यार्थ्यांच्या या हरकतीची गंभीर दखल घेण्यात आल्याचे सूचित केले आहे. विद्यार्थ्यांच्या या हरकतीमुळे ऑनलाईन वर्ग २५ जूनपासून बंद ठेवण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. तसेच हे प्रकरणात सायबर गुन्हा विभागाकडे तक्रार नोंदविण्यात आल्याची माहितीही त्याच पत्रात विद्यार्थी आणि पालकांना देण्यात आली आहेत.