पणजी : गोव्यात येणा-या पर्यटकांना येथील ऐतिहासिक वारसा स्थळांचीही सहल घडावी यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले आहे. पुरातत्त्व आणि पुराभिलेख खात्याच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन पर्यटन योजना विचाराधीन आहेत. ऐतिहासिक वास्तू तसेच पुरातन वारसा स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. पहिल्या सर्किट अंतर्गत डिचोली तालुक्यातील नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिर तसेच आजुबाजुचा परिसर, पुरातन गुहा, झरे, मंदिरे आणि जैन समाजाची पुरातन वसाहत याचा समावेश असेल तर दुस-या सर्किट अंतर्गत साखळी परिसरातील जैन मंदिर, सूर्यमंदिर तसेच जैन भिक्षुकांची स्मारके यांचा समावेश असेल.
पुरातत्त्व, पुराभिलेख विभाग आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. या ठिकाणी वारसा स्थळांची माहिती देणारे फलक लावले जातील. वारसा पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे. दरवर्षी सुमारे ८0 लाख देशी पर्यटक तसेच ६ लाख विदेशी पर्यटक गोव्याला भेट देतात. येथे येणारे पर्यटक हे केवळ येथील किना-यांना भेट देतात त्यांना राज्याचा वारसा कळावा या हेतूने हा प्रयत्न आहे.
सप्तकोटेश्वर मंदिर १६६८ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरुन बांधले. या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सध्या चालू असून ते येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.