गोव्याला कोळसा हब बनवण्याचा डाव; खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची लोकसभेत चौफेर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2024 08:09 AM2024-07-23T08:09:34+5:302024-07-23T08:11:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : ' गोवा हे राज्य म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाते. मात्र आता गोव्याला कोळसा ...

plot to make goa a coal hub mp viriato fernandes criticized in the lok sabha | गोव्याला कोळसा हब बनवण्याचा डाव; खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची लोकसभेत चौफेर टीका

गोव्याला कोळसा हब बनवण्याचा डाव; खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची लोकसभेत चौफेर टीका

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'गोवा हे राज्य म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाते. मात्र आता गोव्याला कोळसा हब बनवण्याचा डाव खेळला जात आहे' असा आरोप दक्षिण गोव्याचे खासदार, कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी लोकसभेत केला.

लोकसभेतील भाषणात खासदार विरियातो म्हणाले की, 'गोवा हे सुंदर राज्य अशी अनेकांची ओळख आहे. मात्र, मागील काही वर्षांत गोमंतकीय लोकांवर कटकारस्थान रचून प्रकल्प लादले जात आहे. प्रकल्पांबाबत लोकांना विश्वासात घेतले जात नाही. केवळ कोळसा वाहतुकीसाठी हे सर्व केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

फर्नांडिस म्हणाले, की सरकारने गोव्यातील नद्या आपल्या ताब्यात घेतल्या. सहा नद्यांचे अगोदर राष्ट्रीयीकरण केले. त्यानंतर कोविड काळात रेल्वे दुपदरीकरण, तामनार प्रकल्प तसेच महामार्ग विस्तारीकरण असे तीन प्रकल्प लोकांवर लादले. प्रकल्पांना विरोध होत असूनही ते पुढे रेटले जात आहेत. सरकारने काही सांगितले तरी या प्रकल्पांद्वारे केवळ कोळसा वाहतुकीला चालना देण्यासाठी व गोव्याला कोळसा हब बनवण्यासाठी हे सर्व केले जात आहे' असा आरोप त्यांनी केला.

'गोवा १९६१ साली पोर्तुगिजांच्या राजवटीतून मुक्त झाले. तेव्हापासून राज्यात पर्यटन उद्योग हे एकमेव क्षेत्र आहे, जे चांगले काम करीत आहे. खाण बंदीनंतर पर्यटन उद्योगात कार्यरत आहे. कृषी क्षेत्र अपेक्षेनुसार काम करीत नाही. कृषी क्षेत्राला प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. अशातच गोव्याला कोळसा हब बनवू देऊ नका. सरकारने प्रकल्प आणताना जनतेला विश्वासात घ्यावे. कारण पर्यटन हा एकमेव उद्योग आहे, जो युवकांना रोजगार देतो. अन्यथा राज्य उद्ध्वस्त होईल, अशी भीतीही फर्नाडिस यांनी व्यक्त केली.
 

Web Title: plot to make goa a coal hub mp viriato fernandes criticized in the lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.