लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : योग्य भावात बी-बियाणे अन् अवजारे शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके, कृषी औजारांसह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने कृषी समृद्धी केंद्र सुरू केले आहे. दक्षिण गोव्यात ६ समृद्धी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रात शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, खते कीटकनाशक औषधांपासून शेतीची अवजारेही मिळतात. त्याचा लाभ शेतकरी वर्गाला होत आहे.
काय आहे पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र ?
केंद्र सरकारने शेतकयांच्या हिता- बरोबर कृषी व्यवसायाला चालना देणे व कृषी उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरू केले आहे. शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते, कीटकनाशक औषधांपासून शेतीची अवजारे एकाच छताखाली मिळावी हेच समृद्धी केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या केंद्रात काय मिळणार?
या समृद्धी केंद्रात बी-बियाणे, खते, कीटकनाशके, कृषी अवजारांसह शेतकऱ्यांना हव्या असलेल्या सर्व सुविधा मिळतात.
शेतकऱ्यांना मिळणार योग्य मार्गदर्शन
या समृद्धी केंद्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले जाते. भातशेती, फलोत्पादन, वनस्पतीशास्त्र, मत्स्यालय व इतर शेतीच्या विभागात तज्ज्ञ अधिकारी आहेत. शेतकऱ्याला त्यांच्या कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या शेतीचे उत्पादन व उत्पन्नवाढीसाठी मार्गदर्शनही केले जाते.
योग्य भाव, खतांवर सबसिडी
या समृद्धी केंद्रात शेतकऱ्यांना योग्य भाव दिला जातो. तसेच खते व शेतीची अवजारे विकत घेण्यासाठी ५० टक्के सबसिडी दिली जाते. अनुसूचित जाती व जमातींसाठी ९० टक्के सबसिडी दिली जाते.
कोणत्या तालुक्यात किती केंद्रे आहेत?
मुरगांव, फोंडा, सासष्टी, सांगे, केपे व काणकोण या तालुक्यांत प्रत्येकी एक समृद्धी केंद्र आहे. मुरगाव-कासावली, फोंडा वरचा बाजार फोंडा, सासष्टी -मडगाव, केपे दत्तमंदिर जवळ, सांगे-काले फार्म, काणकोण- आगोंद.
दक्षिण गोव्यात किती समृद्धी केंद्रे आहेत?
- दक्षिण गोव्यात एकूण ६ समृद्धी केंद्रे आहेत.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उज्ज्वल भवितव्य नजरेसमोर ठेवून पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रे सुरु केली आहेत. देशभरात सर्वत्र ही समृद्धी केंद्रे सुरू आहेत. आपल्याकडे तालुका पातळीवर उत्तर गोव्यात ६ व दक्षिण गोव्यात ६ मिळून एकूण १२ समृद्धी केंद्रे सुरू आहेत. शेतकयांना हवी असलेले बी-बियाणे व सर्व सुविधा या केंद्राच्या छताखाली मिळतात. - ज्योविता सिकेरा, कृषी अधिकारी, विभागीय कार्यालय, मडगाव-गोवा.