पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे नवे मुख्यमंत्रीप्रमोद सावंत यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. मनोहर पर्रीकरांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर सावंत यांनी मध्यरात्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
गोमंतकीयांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपण शुभेच्छा देत असल्याचे नमूद करुन पंतप्रधान मोदी यांनी गोव्याच्या प्रगतीला नवी दिशा देण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही वर्षात राज्यात केलेल्या विकासकामांचाही त्यांनी उल्लेख केला आहे. सावंत यांच्यासह 11 मंत्र्यांना मध्यरात्री राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी राजभवनावर शपथ दिली. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि मगोपचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर हे उपमुख्यमंत्री आहेत.
प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चा आणि वाटाघाटींनंतर अखेर भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी प्रमोद सावंत यांचा शपथविधी संपन्न झाला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तसेच मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक, निलेश काब्राल यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
''पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन,'' असे प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर सांगितले. तसेच यावेळी आपल्या कारकीर्दीचे श्रेय सावंत यांनी मनोहर पर्रीकर यांना दिले. ''मी आज जो काही आहे तो मनोहर पर्रीकर यांच्यामुळेच आहे. मनोहर पर्रीकर हे मला राजकारणात घेऊन आले होते. त्यामुळे मी गोवा विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळले तसेच आज माझी मुख्यमंत्रिपदी निवड झाली ती पर्रीकर यांच्यामुळेच झाली आहे."असे प्रमोद सावंत यांनी सांगितले.