लोकमत न्यूज नेटर्वक फोंडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचला आहे. देश बलशाली करण्याचे त्यांचे ध्येय आहे, त्यासाठी समाजातील कमकुवत घटकांकडे त्यांनी विशेष लक्ष दिले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
भाजपच्या घर चलो अभियानांतर्गत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी सायंकाळी सावर्डे मतदारसंघातील मोले पंचायतमधील विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी ते बोलत होते. स्थानिक आमदार गणेश गावकर, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, सावर्डे भाजपा मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई आदी त्यांच्याबरोबर उपस्थित होते. अभियानाची सुरुवात झरीवाडा मोले येथून करण्यात आली.
सर्व घटकांसाठी पंतप्रधानांनी त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या आहेत. महिलांवर अत्याचार होऊ नये, यासाठी तीन तलाक विधेयक त्यांनी संसदेत मंजूर केले. युवा शक्तीसाठी खेलो इंडिया, स्कील इंडिया सारख्या योजना अमलात आणल्या. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड व अन्य महत्त्वाच्या योजना राबवण्यात आल्या आहेत. गरिबांच्या कल्याणासाठी अनेक कुटुंबांना मोफत धान्य देण्याची योजनाही त्यांनी अमलात आणली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक क्षेत्रात भारत इतर देशांच्या तुलनेत अव्वल असला पाहिजे, हे स्वप्न नजरेसमोर ठेवून पंतप्रधान मोदी काम करत आहेत. आमदार गणेश गावकर म्हणाले, ग्रामीण भागातील पंचायतींनी नेहमीच भाजपा सरकारला पाठिंबा दिला आहे. तसाच पाठिंबा भविष्यात कायम राहणार आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सावर्डे मतदारसंघाचा विकास झपाट्याने होत आहे. ज्येष्ठ रंगकर्मी अपा गावकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. सूत्रसंचालन रामकृष्ण गावकर, कपिल नाईक यांनी आभार मानले.