लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : 'सबका साथ, सबका विकास' हा मोदींचा नारा देशाने उचलून धरलेला असून पुन्हा एकदा संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आली आहे. त्याची प्रचिती कालच्या एक्झिट पोलमध्ये दिसून आली आहे. प्रत्यक्षात ४ जून रोजी 'अबकी बार ४०५' हा नारा पूर्णपणे यशस्वी होणार असल्याची खात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे.
एक्झिट पोलसंदर्भात देशात भाजपला ३७५ ते ४०० या दरम्यान जागा मिळणार असल्याचा कल बहुतेक प्रसारमाध्यमांनी दिला आहे. गोव्यात एक एक असे दाखविण्यात आले, तरीही गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपच विजयी होणार, याबद्दल कोणतीही शंका नाहीच, अशी खात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
७५ टक्क्यांहून अधिक मतदान, भाजपसाठी जमेच्या बाजू
दक्षिण गोव्यात संपूर्ण ग्रामीण भागातील जनतेमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला आहे. ७५ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याने भाजपसाठी ती मोठी जमेची बाजू असून भाजप दक्षिण गोव्यातही २५ हजारांहून अधिक आघाडी मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अरुणाचल रणनीती यशस्वी
अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले असून काँग्रेसची सफाई झाली आहे. अरुणाचल प्रदेशच्या निकालावरून देशात भाजप व मोदी यालाच पसंती असल्याचा उलगडा स्पष्टपणे झाला असून त्याची प्रचिती दि. ४ जून रोजी ४०० पारच्या माध्यमातून होणार आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने प्रचार रणनीती आखण्यात आली आणि हा मोठा विजय संपादन झाला, त्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह तसेच अरुणाचल प्रदेशचे भाजप नेते प्रदेशाध्यक्ष आदींचे विशेष अभिनंदन केले आहे.