लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत विधानसभेत राजकीय आरक्षण देण्यासाठी, एसटी समुदायांचे प्रलंबित स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम व्यक्ती आहेत, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.
आपले स्वार्थी राजकीय ध्येय साध्य करण्यासाठी जे तथाकथित नेते राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करत आहेत, असे म्हणत त्यांच्यावर कामत यांनी गुरूवारी जनजाती गौरवदिन कार्यक्रमात बोलताना टीका केली. केंद्रातील स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन सरकारने गोव्यातील गावडा, कुणबी, वेळीप असे तीन समुदाय अनुसूचित जमाती म्हणून घोषित केले होते, याची त्यांनी आठवण करून दिली.
भाजप दक्षिण गोवा जिल्हा कार्यालय, मडगाव येथे गुरुवारी आयोजित कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गोवा भाजप एसटी मोर्चातर्फे जनजाती गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी कामत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर एनआरआय आयुक्त आणि भाजप गोवा सरचिटणीस नरेंद्र सावईकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मडगाव नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर हे विशेष निमंत्रित म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी रिवण जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर आणि मडगावच्या नगरसेविका मिलाग्रीना गोम्स उपस्थित होते.
सावईकर यांनी आपल्या भाषणात एसटी बांधवांचे सर्व सामाजिक उपक्रमांत पुढे येत असल्याबद्दल आणि शिक्षण, आरोग्य, क्रीडा व राजकीय क्षेत्रात झोकून देण्याच्या तत्परतेबद्दल कौतुक केले. राष्ट्रीय खेळांमधील यशस्वीतांचेही कौतुक केले.