पणजी - केंद्रीय मंत्रिमंडळात श्रीपाद नाईक यांचा समावेश अखेर आता निश्चित झाला आहे. पंतप्रधानांनी शपथविधी सोहळ्य़ापूर्वी आपल्या निवासस्थानी सायंकाळी पाच वाजता ज्या खासदारांना बोलावले आहे, त्यांना मंत्रीपद दिले जाणार आहे. श्रीपाद नाईक यांनाही बोलावणे आले आहे.
श्रीपाद नाईक दिल्लीत आहेत. त्यांनी केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन जेटली यांच्या तब्येतीविषयी विचारपूस केली. श्रीपाद नाईक यांना यावेळी पुन्हा मंत्रिपद मिळणार की नाही हे स्पष्ट होत नव्हते. श्रीपाद नाईक हे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून पाचवेळा जिंकून आल्याने त्यांना मंत्रीपद दिले जाईल अशी चर्चा गोव्यात सुरू होतीच. लोकमतने श्रीपाद नाईक यांच्याशी गुरुवारी (30 मे) दुपारी साडेबारा वाजता संवाद साधला. त्यावेळी श्रीपाद नाईक यांनी आपले मंत्रिपद निश्चित झाले व आपल्याला निमंत्रणही आल्याचे सांगितले. श्रीपाद नाईक खूश झाले व त्यांनी आपण सर्वाना धन्यवाद देतो, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. नाईक यांनी यापूर्वी वाजपेयी मंत्रिमंडळातही काम केले आहे. त्यांनी अनेक मंत्रालयांचा कारभार केंद्रीय राज्यमंत्री या नात्याने हाताळला आहे.
श्रीपाद नाईक हे सलग पाचवेळा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून जिंकून आले आहेत. 1999 सालापासून ते उत्तर गोव्यातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत व ते एकदाही पराभूत झालेले नाहीत. यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा 80 हजार मतांच्या फरकाने पराभव केला आणि काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह गोव्यातील भाजपाप्रणीत आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांचे मंत्री व अपक्ष मंत्री यांनाही मोदींच्या शपथविधी सोहळ्य़ाचे निमंत्रण आहे. तसेच गोवा सरकारच्या विविध महामंडळांचे चेअरमन असलेल्या आमदारांनाही शपथविधी सोहळ्य़ाचे निमंत्रण आहे. लोकसभेच्या दोनपैकी एक जागा भाजपाने जिंकली व विधानसभेच्या चारपैकी तीन जागांवर भाजपाने विजय मिळवला. याचे श्रेय मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाला जाते. गोव्याचे पूर्ण मंत्रिमंडळ कधीच कोणत्याच पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नव्हते. यावेळी ती संधी आली आहे.