लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत कोंकणी भाषेत भाषण करून आपले वेगळेपण दाखविले. सुरुवातीला त्यांनी कोंकणी भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विविध योजनांचे कौतुक केले. हिंदी भाषेत त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.
खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ नंतर देशात शहरी विकास आणि आवास योजना राबवून अनेकांना स्वतःचे हक्काचे घर दिले आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एक कोटी १२ लाख घरे बांधून अनेक गरीब लोकांना स्वतःचे हक्काचे घर दिले आहे.
खासदार तानावडे यांनी यावेळी सांगितले की, पुढील पाच वर्षांत पंतप्रधान आवास योजना २.० अंतर्गत १० कोटी खर्च करून शहरी भागातील गरीब लोकांना हक्काची घरे बांधली जाणार आहेत. पंतप्रधानांच्या योजनांनी आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या विकासाला गती मिळाली आहे. धन सुविधांच्या विकासाला वेग आला आहे, असे तानावडे म्हणाले.
देशात १२ कोटी घरगुती आणि २ लाख सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. याचा महिलांना खूप लाभ झाला आहे. यामुळे देशभर स्वच्छतेसाठी चळवळ उभी राहिली. तसेच स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत मोदी सरकारने १०० स्मार्ट शहरांची निवड केली. विकसित भारत २०४७ साध्य करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. अमृत या योजनेचा मुख्य उद्देश शहरातील सर्व साधन सुविधा व विकास करणे आहे. मोठ्या महानगरांत वाहतूक व्यवस्था बळकट केली आहे. वंदे भारत यांसारख्या मेट्रो रेल्वेने लोकांचा प्रवास जलद झाला आहे. तसेच बांधकाम क्षेत्रात अनेक सुधारणा केली आहे. तसेच शहरी गरीब गरजू लोकांना हातगाडे योजना तसेच अन्य विविध योजना राबविल्या आहेत. याचा लाखो लोकांना लाभ झाला आहे. - सदानंद शेट तानावडे, खासदार