वास्को: दक्षीण गोव्यातील वेर्णा पोलीसांनी दुचाकी चोरांच्या ८ जणांच्या एका टोळीला गजाआड केले असून या टोळीत सहा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या टोळीला गजाआड करून त्यांच्याकडून चार चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आलेल्या असून अन्य एक दुचाकी जप्त करण्याच्या मार्गावर पोलीस असल्याची माहिती निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिली.काही दिवसापूर्वी कुठ्ठाळी येथील चर्चमध्ये झालेल्या चोरी प्रकरणात वेर्णा पोलीसांनी पोबारा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच संशयित चोरट्यांपैकी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी चर्चमधील चोरी प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर त्याचा दुचाकी चोरांच्या एका टोळीतसुद्धा सहभाग असल्याची माहिती उपलब्ध झाली. यानंतर वेर्णा पोलीसांनी सदर दुचाकी चोरांच्या टोळीला पकडण्यासाठी सापळा रचल्यानंतर सोमवारी (दि.२९) पहाटे त्यांनी आठ जणांच्या चोरांच्या एका टोळीला गजाआड केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिली. सदर टोळीतील संशयित गोव्यातील विविध भागात लपून बसलेले असल्याची माहिती चोडणकर यांनी देऊन त्यांना त्या त्या ठिकाण्यावरून गजाआड करण्यात आले असल्याचे सांगितले.
पकडण्यात आलेल्या टोळीकडून अजून वेर्णा पोलिसांनी चार दुचाकी जप्त केल्या असून यात दोन पल्सर, १ एवियेटर व १ केटीएम दुचाकीचा समावेश असल्याचे सांगितले. या टोळीने अन्य एक पल्सर दुचाकी चोरी केलेली असल्याचे अजूनपर्यंत स्पष्ट झाले असून लवकरच ती जप्त करण्यात येणार अशी माहिती देण्यात आली. सदर दुचाकी बेळगाव, फोडा, म्हापसा व वेर्णा भागातून चोरी करण्यात आल्या होत्या अशी माहीती पोलीसांनी दिली.
वेर्णा पोलीसांनी दुचाकी चोरांच्या गजाआड केलेल्या आठ जणांच्या या टोळीतील सहा जण अल्पवयीन असल्याने त्यांना मेरशी येथील अपना घरात पाठवलेले असल्याचे निरीक्षक चोडणकर यांनी सांगितले. सदर टोळीतील अन्य दोन संशयित चोरट्यांची नावे सुरज राजू कोकाटे (रा. बेतूल, वेळ्ळी. वय १९) व क्लाईव मानुयेल कास्ताना (रा. विराभाट, कुडतरी. वय १९) असे असल्याची माहिती देऊन त्यांना या चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले असल्याचे सांगितले. या टोळीत अन्य चोरट्यांचासुद्धा समावेश असण्याची शक्यता असून त्यांनी अन्य वाहने सुद्धा चोरी केली असावीत असा संशय पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत असून याबाबत सर्व मार्गाने तपास चालू आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या चोरीच्या या चार दुचाकींची किंमत ४ लाख ७ हजार रुपया असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिली. काही दिवसापूर्वी कुठ्ठाळी येथील चर्च तसेच साकवाळ येथील गणपती मंदिरात (एकाच दिवशी) झालेल्या चोरी प्रकरणात वेर्णा पोलीसांनी पकडलेल्या या टोळीतील काही संशयित चोरट्यांचा हात असू शकतो असा संशय व्यक्त केला असून त्याही मार्गाने पोलीस तपास करत आहेत.दुचाकी चोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी अधिकाऱ्यांसह ३० पोलीस शिपायांनी घेतले परिश्रमकुठ्ठाळी येथील चर्चमध्ये चोरी करून पलायन करत असताना पाच जणाच्या टोळीतील एका अल्पवयीन संशयिताला वेर्णा पोलिसांना पकडल्यानंतर त्याचा दुचाकी चोरांच्या टोळीत हात असल्याची माहिती उपलब्ध झाली. या चोरांच्या टोळीने विविध ठिकाणी दुचाकी चोरी केली असल्याची माहिती पुढे उपलब्ध झाली असून ते गोव्यातील विविध भागात लपून असल्याचे समजले. सदर टोळीला गजाआड करण्यासाठी वेर्णा पोलिसांना दक्षिण गोवा जिल्हा पोलीस तपासणी विभागाचा पूर्ण पाठींबा मिळाला असून या चोरट्यांना गजाआड करण्यासाठी अधिकाऱ्यांसह एकूण ३० पोलीस जवानांची (एलआयबी) मदत मिळाली असल्याचे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी सांगितले.