- पूजा प्रभूगावकर पणजी - ऑनलाईन जुगाराविरोधात पोलिस धडक कारवाई करीत आहे. गरज पडल्यास त्याविराेधात कायदा केला जाईल. गोव्यात ऑनलाईन जुगाराला थारा नसेल असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर तासात दिला.
राज्यातील तरुण मंडळी ऑनलाईन जुगाराच्या आहारी जात आहेत. विविध ॲप डाऊनलोड करुन ते ऑनलाईन जुगारातलाखो रुपये गमवत आहेत. यामुळे तरुण पिढीचे भविष्य खराब होत असून सरकारने त्यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रश्नोत्तर तासात केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.
आलेमाव म्हणाले, की तरुण वर्ग ऑनलाईन जुगाराच्या जाळ्यात अडकत आहेत. विविध ॲप ते आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन हा ऑनलाईन जुगार खेळत आहे. यातून ते लाखो रुपये गमावत असल्याने काही जणांनी आत्महत्याही केली.राज्यात अनेक ठिकाणी हा ऑनलाईन जुगार सुरु आहे. याविरोधात कठोर कारवाई आवश्यक आहे.तामिळनाडू सरकारने या ऑनलाईन जुगाराविरोधात कायदा तयार केला असून त्यात धर्तीवर तो गोव्यातही व्हावा अशी मागणी त्यांनी केली.
ऑनलाईन जुगार हा गंभीर विषय आहे. किनारी भागात हे प्रमाण जास्त आहे.यावर्षी गोवा पोलिसांनी ऑनलाईन जुगार प्रकरणी सात गुन्हे नोंद करुन काहींना अटकही केली होती.तामिळनाडूने तयार केलेला ऑनलाईन जुगाराविरोधातील कायद्याचा अभ्यास केला जाईल. वेळ पडल्यास त्यातच धर्तीवर गोव्यातही हा कायदा करु असे आश्वासन त्यांनी दिले.