पणजी: २८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या वागातोर येथील सनबर्न म्युझीक डान्स पार्टीत ड्रग्सचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन गोवा पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. पोलिसांच्या विविध तुकड्या बनवून करडी नजर ठेवली जाणार आहे.
उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी या विषयी माहिती देताना सांगितले की वर्षाच्या समाप्तीला गोव्यात होणाऱ्या म्युझिक पार्ट्यांत अंमली पदार्थांचा वापर केला जाऊ नये यासाठी पोलीसांची करडी नजर आहे. यासाठी अंमली पदार्थ विरोधी विभाग तर काम करीतच आहे, परंतु जिल्हा पोलीसांकडूनी खबरदारी घेतली जात आहे.
विशेषत: २८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या वागातोर येथील सनबर्न म्युजिक डान्स फेस्टीवलवर आमचे लक्ष्य असून या पार्टीत अंमली पदार्थांचा वापर होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त करण्यात येणार आहे. पोलिसांच्या विविध तुकड्या बनवून प्रत्येक तुकडीवर विशिष्ठ कामगिरी सोपविली जाणार आहे. यासाठी चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच बैठक होणार आहे असे वाल्सन यांनी सांगितले.
दरम्यान सनबर्न फेस्टीवल्च्या पार्श्वभूमीवर मोरजीत १ कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. तसेच त्यानंतरही उत्तर गोव्यात अनेक ठिकाणी ड्रग्स जप्त करण्यात आला होता. रविवारी शिवोली येथे तब्बल १६.४४ लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. यापूर्वी अनेकवेळा सनबर्न पार्टीत नाचणारे पर्यटक कोसळून त्यांचा मृत्यु होण्याचे प्रकार घडले आहेत. ड्रग्सचा ओव्हरडोस झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी ड्रग्सचा वापर रोखण्यासाचे पोलिसांपुढे मोठे आव्हान ठाकले आहे.