लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी पर्यटक येत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे तुरुंगातून सुटलेले कैदी आणि गुन्हेगार यांच्यावर विशेष नजर असणार आहे. त्याचबरोबर परराज्यातील गुन्हेगारांच्या हालचालीवरही पोलिसांची करडी नजर असल्याची माहिती उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.
गुरुवारी लोकमत कार्यालयास वाल्सन यांनी भेट दिली. यावेळी गुन्हेगारी, पोलिस यंत्रणेची तयारीसह विविध मुद्यांवर दिलखुलास चर्चा केली. गोव्यात नवर्षारंभाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. यंदाही तो ओघ दिसून येत आहे. यावेळी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. गोव्यात होणाऱ्या गुन्हेगारीत गोव्याबाहेरील गुन्हेगारांचा अधिक समावेश असल्याचे समोर आले आहे.
विशेषतः गोव्याबाहेरील तुरुंगातून सुटलेल्या लोकांवर अधिक लक्ष ठेवले जाणार आहे, असेही ते म्हणाले. मोबाईल चोरणे, पाकीटमारणे यासारखे गुन्हे करणाऱ्यांच्या काही टोळ्या असतात. गेल्यावर्षी अशा मोठ्या टोळ्यांना पोलिसांनी पकडले होते. सनबर्नवेळी तर अशा टोळ्या महागाड्या वाहनातून गोव्यात दाखल होऊन हॉटेलमध्ये राहिल्या होत्या. त्यांना अटक करण्यास कळंगुट पोलिसांना यश आले होते. यावेळीही पोलिस यंत्रणा सतर्क असल्याचे वाल्सन यांनी सांगितले.
साध्या वेशातील पोलिसांची पाळत, सीसीटीव्हीद्वारे देखरेख तसेच इतर माध्यमातून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना रडारवर ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबर अखेरीस गोव्यात परिस्थिती काय असते याची माहिती पोलिसांना आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्या उपाय योजना करायला हव्यात हे ठरविण्यासाठी बैठका होत आहेत. अंमली पदार्थाचा वापर रोखण्यासाठीही यंत्रणे सज्ज करण्यात आली आहेत.
बाहेरून येणाऱ्यांचा उपद्रव रोखण्यास यंत्रणा सज्ज
गोव्यात तसे गुन्हेगारांचे प्रमाण अधिक नाही, गुन्हेगारी गॅग तर मोडून काढल्या आहेत. काहींना तडीपारही केले आहे तर अनेकांना हिस्ट्रीशिटरच्या यादीत टाकले आहे. यामुळे गोव्याबाहेरून येणाऱ्या गुन्हेगारांना रोखण्याचे आव्हान असणार आहे. त्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीची माणसे गोव्यात येतात काय यावर अधिक लक्ष असणार आहे.