मडगाव: अती वेगाने कार हाकल्यामुळे ज्या वेर्णा पठारावर तीन शाळकरी मुलांचा प्राण गेला त्या पठारावर आता सुरक्षेचे उपाय घेण्यासाठी तयारी चालविली असून या रस्त्यावर दुभाजक घालण्या बरोबरच अर्धे स्पीड ब्रेकर घालण्याची शिफारस ट्रेफिक पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे. मागच्या रविवारी या पठारावर झालेल्या भीषण अपघातात तीन विध्यार्थ्यांचा बळी गेला होता.
दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी सोमवारी वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत ह्या जागेची पाहणी केली. भविष्यात असे अपघात घडू नायेत आणि ह्या पठारावर ड्रॅग रेससारखे प्रकार आयोजित केले जाऊ नयेत म्हणून हे उपाय सुचविले गेले आहेत. ज्या पठारावर हा भीषण अपघात झाला त्या ठिकाणी सरळ रस्ता असल्याने दर शनिवार रविवारी तिथे अशा जीवघेण्या रेसिस होतात, या पूर्वीही त्या ठिकाणी स्टंट करताना दुचाकी सवरणी आपले प्राण गमाविले आहेत.
अधीक्षक गावस यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे रस्ता सरळ असल्याने तेथे वेगात वाहने हाकली जातात. या रस्त्याच्या बाजूला खोलगट दरी सदृश्य जागा असून ती खडकाळ असल्याने हा पठारच जीवघेणा ठरला आहे. वाहने रस्त्याच्या बाजूने जाऊन दरीत पडू नयेत यासाठी रस्त्याच्या बाजूला क्रॅश बरीअर्स बसविण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान या अपघात प्रवण क्षेत्राची दखल जिल्हा वाहतूक सुरक्षा समितीनेही घेतली असून ही जागा आयडीसीच्या ताब्यात असल्याने आणि त्या जागेचा कुणी उपयोग करीत नसल्याने ही जागा वाहन चालकासाठी प्रतिबंधित करता येणे शक्य आहे का यावर विचार करावा अशी मागणी रॉलंड मार्टिन्स यांनी केली. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी तसेच आयडीसीचे चेरमन ग्लेन टिकलो यांचाशी संपर्क साधणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यानी परवाण्याशिवाय वाहने चालवू नयेत यासाठीही शिक्षण संस्थांची एक बैठक बोलावली जाईल असे त्यांनी सांगितले.
वाहन चालविण्याचा परवाना नसताना अल्पवयींनाच्या हाती गाडी चालवायला दिली यासाठी एका मृत मुलाच्या आईच्या विरोधात मायणा कुड्तरी पोलीस गुन्हा नोंद करणार आहेत अशी माहिती मिळाली. त्या दिशेने आमचा तपास चालू असल्याचे गावस यांनी सांगितले.